वसमत – देशाच्या ७७व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत वसमत शहरात एक भव्य, देखणा आणि सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश देणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या भव्य कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन सय्यद इमरान अली वेल्फेअर फाउंडेशन व आमदार राजू भैया नवघरे सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून, उपनगराध्यक्ष सय्यद इमरान अली हे या कार्यक्रमाचे प्रमुख सूत्रधार आहेत तर आमदार राजू भैय्या नवघरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत .
प्रजासत्ताक दिन हा संविधान, लोकशाही व राष्ट्रीय एकात्मतेचा उत्सव आहे. या पवित्र दिनाचे औचित्य साधत समाजात सलोखा, बंधुभाव व सद्भावना निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संगीत व अध्यात्माच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र आणणारा हा उपक्रम वसमत शहरासाठी अभिमानास्पद ठरणार आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे देशभरात आपल्या दमदार आवाजासाठी, सूफी रंगतदार सादरीकरणासाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध कव्वाल रईस अनिस साबरी, त्यांच्या कव्वालीतून देशप्रेम, मानवता, प्रेम,श्रद्धा आणि शांततेचा सुरेल संगम अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. कव्वालीच्या तालावर वसमत शहर सूफी रंगात रंगणार असून, हा सोहळा प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाला एक वेगळी उंची देणारा ठरेल.
या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व धर्म, समाज आणि वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा कार्यक्रम केवळ करमणुकीपुरता मर्यादित नसून, समाजाला एकत्र बांधणारा, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा उपक्रम आहे.
या भव्य कव्वाली कार्यक्रमास सर्व नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून प्रजासत्ताक दिनाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन आयोजक सय्यद इमरान अली वेल्फेअर फाउंडेशन व आमदार राजू भैया नवघरे सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे.
























