तभा फ्लॅश न्यूज : कळंब तालुक्यातील खामसवाडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. शेतात जात असलेल्या अनिल मनोहर गुंड (वय अंदाजे ३५) या तरुण शेतकऱ्याचा विद्युततार तुटून अंगावर पडल्याने जागीच मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या मागे पत्नी आणि तीन अल्पवयीन मुली असा परिवार आहे.
अनिल गुंड हे स्वतःच्या विस गुंठे जमिनीवर शेती करत होते, मात्र उत्पन्न अपुरे असल्याने ते अन्य शेतांमध्ये मोलमजुरी करून कुटुंबाची गुजराण करत होते. शेजारील विजेच्या खांबावरील तार अचानक तुटून त्यांच्यावर पडली व विद्युत प्रवाहाने त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची बातमी गावात वेगाने पसरली. गावातील युवकांनी व्हाट्सअॅप मेसेजद्वारे आर्थिक मदतीचे आवाहन करताच काही तासांतच हजारो रुपयांची मदत गोळा झाली. सोमनाथ हिरे व त्यांच्या मित्रमंडळींनी मदतीसाठी पुढाकार घेतला.
या सामाजिक एकतेच्या दर्शनामुळे संकटात सापडलेल्या कुटुंबाला तातडीचा दिलासा मिळाला. मात्र गावातील एक कष्टकरी, मेहनती तरुण शेतकरी अचानक निघून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.