बीड – केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत सिरसाळा येथे भव्य शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या तयारीचा रविवार, दिनांक 02 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आढावा घेतला. कृषीकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस विविध शासकीय कार्यालयांचे कार्यालयीन प्रमुख उपस्थित होते.
शेतकरी संवाद मेळाव्यास मराठवाड्यातील हजारो शेतकरी उपस्थित राहणार आहेत. याच ठिकाणी कृषी प्रदर्शिनी भरवण्यात येणार आहे. युद्ध पातळीवर मंडप उभारणी, हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी हेलिपॅड तयार करण्यात येत असून, सुरू असलेल्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. सर्व प्रशासकीय विभागांना त्यांनी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. या आढावा बैठकीस ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मयंक गांधी यांच्यासह सर्व प्रमुख संयोजकांची उपस्थिती होती.
ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मयंक गांधी यांची प्रेरणा आणि संकल्पनेतून दिनांक 07 नोव्हेंबर रोजी सिरसाळा येथे भव्य शेतकरी संवाद मेळावा संपन्न होत आहे. या कार्यक्रमास देशाचे कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पशुसंवर्धन तथा दुग्धविकास मंत्री पंकजाताई मुंडे, खा.बजरंग सोनवणे, खा.रजनीताई पाटील, माजी मंत्री आ.धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित असतील.
सदरील कार्यक्रमास राज्यातील 35 ते 40 हजार शेतकरी उपस्थित राहणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. आलेल्या शेतकऱ्यांना बसण्यासाठी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येत आहे तर येणाऱ्या मान्यवरांचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी कार्यक्रमस्थळीच हेलिपॅडची व्यवस्था करण्यात येत आहे. कृषीकुल प्रशिक्षण केंद्र सिरसाळा येथे जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या प्रशासकीय आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, नगर पालिका, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती आरोग्य विभाग आदींसह अनेक शासकीय विभागांचे कार्यालयीन प्रमुखांची उपस्थिती होती.
अभूतपूर्व शेतकरी संवाद मेळावा मराठवाडा हा सर्वाधिक दुष्काळी प्रदेश म्हणून गणल्या जातो. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळा सतत पडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कमालीची ढासळली आहे. आर्थिक संकटात आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्येचे मार्ग पत्करले.
ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे, त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली पाहिजे, त्यांच्यातील हरवलेला आत्मविश्वास पुन्हा नव्याने जागवला पाहिजे हा या शेतकरी संवाद मेळाव्याचा प्रमुख उद्देश असून, शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना ग्लोबल विकास ट्रस्टकडून तयार करण्यात आल्या असून त्यांचीही घोषणा याच कार्यक्रमात होणार आहे. त्यामुळे हा अभूतपूर्व व भुतो न भविष्यती असा शेतकरी संवाद मेळावा होणार आहे. या मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.




















