सोलापूर : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या झोन चार आणि पाच कडील इतर काही जण कडील घंटागाडी कामगारांनी प्रलंबित वेतनासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सुरू केलेला संप अखेर आज तिसऱ्या दिवशी मिटला. महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी संबंधित घंटागाडी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या शिष्टाईनंतर आज शुक्रवारी दुपारी तीन वाजल्यानंतर शहरात त्या – त्या ठिकाणी घंटागाड्या मार्गस्थ झाल्या.
सोलापूर शहरातील कचरा घरोघरी जाऊन संकलित करण्यासाठी महापालिका प्रशासनाने घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलन करण्याचा मक्ता दिला आहे. या मक्तेदारांकडून कंत्राटी पद्धतीने घंटागाडी कामगार ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी झोन चार आणि पाच कडील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी बुधवारी दोन महिन्यापासून पगार झाला नसल्याकडे लक्ष वेधत संप पुकारला होता. जुळे सोलापूर येथील डी मार्ट च्या मागे असलेल्या झोन क्रमांक पाच च्या आवारात एकत्र येऊन जोरदार निदर्शने केली. घंटागाडी मक्तेदार सर्व घंटागाडी कर्मचाऱ्यांची मानसिक, शारिरिक व आर्थिक पिळवणूक करीत आहेत. त्यांच्या त्रासाला कंटाळून बेमुदत संप करीत असल्याचे या घंटागाडी कामगारांनी स्पष्ट केले होते. घंटागाडी कामगारांना दोन महिने झाले पगार दिला नाही.शासन जीआर असतांना आजतगायत नियमाप्रमाणे किमान वेतन मिळत नाही. साप्ताहिक पगारी सुट्टी असतांना मिळत नाही. राष्ट्रीय सणाची सुट्टी मिळत नाही. पगार स्लिप दिली जात नाही. पीएफ, इएसआय पगारातुन कपात होतो पण त्याचा लाभ मिळत नाही. स्कॅनरचे आमचे काम नसतांना करायला लावतात. दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत पगार मिळावा. कामगारांना सुरक्षा साहित्य पुरवले जात नाही, त्यामुळे आमचे आरोग्य धोक्यात आहे. सर्व विषयावर कोणी बोलले तर कामावरून काढण्याची धमकी दिली जाते. याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते.
आज शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी या घंटागाडी कामगारांशी चर्चा केली. अचानक काम बंद ठेवून शहराला वेठीस धरणे योग्य नाही. काम करून आपल्या मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू ठेवा. काम बंद ठेवणे योग्य नाही. तातडीने काम सुरू करा तुमच्या मागण्या संदर्भात सर्व काही सुरळीत झाल्यानंतर तीन-चार दिवसात मक्तेदार आणि कामगारांशी चर्चा करण्यात येईल. नियमानुसार असलेल्या मागण्यांवर निर्णय घेण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना अतिरिक्त आयुक्त पवार यांनी दिल्या. त्यांचे म्हणणे ऐकून अखेर घंटागाडी कामगारांनी संप मागे घेतला. पूर्ववत काम सुरू केले. अतिरिक्त आयुक्तांच्या शिष्टाईमुळे अखेर हा संप मिटला आहे.
घंटागाडी कामगारांशी चर्चा केली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. अगोदर काम सुरू करा. सर्व सुरळीत झाल्यानंतर येत्या चार दिवसात मक्तेदार आणि कामगारांची समन्वय बैठक घेण्यात येईल. त्या मध्ये दोन्ही बाजू ऐकून नियमानुसार असलेले निर्णय घेण्यात येतील. सूचना ऐकून या कामगारांनी पूर्ववत काम सुरू केले आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी दिली.

























