गंगापूर / संभाजीनगर – डायलिसिससाठी वारंवार छत्रपती संभाजीनगर येथे जावे लागणाऱ्या गंगापूर व परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात मोफत डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सुविधेमुळे रुग्णांचा वेळ, आर्थिक खर्च तसेच शारीरिक त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
या मोफत डायलिसिस सेंटरचे उद्घाटन आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते सोमवारी (दि. ५) उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेआहे. यावेळी नगराध्यक्ष संजय जाधव यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कांचन बाने (उपसंचालक, आरोग्य सेवा, छत्रपती संभाजीनगर) होते.
कार्यक्रमास डॉ. दयानंद मोतीपकळे (सहायक संचालक, आरोग्य सेवा), डॉ. कमलाकर मुंडेकर (जिल्हा शल्य चिकित्सक), डॉ. प्रशांत बडे (निवासी वैद्यकीय अधिकारी), तसेच आरोग्य विभागातील इतर मान्यवर उपस्थित होते.
हे डायलिसिस सेंटर लाईफ केअर लिमिटेड, खारघर (मुंबई) यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आले असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. नियमित, वेळेत व मोफत डायलिसिस उपचार उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांचे जीवनमान उंचावण्यास निश्चितच मदत होणार आहे.
गंगापूर तालुक्यातील गरजू रुग्णांनी या मोफत डायलिसिस सेंटरचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार प्रशांत बंब यांनी केले आहे.























