नायगांव – परिस्थितीवर मात करत अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर नायगांव येथील माणिक नगरमधील ओमकार बालाजी पेटेकर याने डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करून तरुणांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
ग्रामीण भागातील खतगांव सारख्या वातावरणातून शिक्षण घेत असताना,ओमकारने आपल्या अभ्यासातील चिकाटी आणि सातत्य टिकवून ठेवले. ई.स. २०२० च्या कोरोना काळात, अनेक अडचणींचा सामना करत त्याने NEET परीक्षेत तब्बल ६२० गुण मिळवून पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले.यायशाच्या जोरावर त्याला मुंबई तील नामांकित जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय शिक्षणा साठी प्रवेश मिळाला.
कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या बळावर त्याने आपले वैद्यकीय शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आणि पेटेकर परिवारातील पहिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला. हा क्षण केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण परिसरा साठी अभिमानाचा ठरला आहे.
ओमकार हा केवळ अभ्यासातच नव्हे, तर विविध क्षेत्रातही अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखला जातो. गायन हा त्याचा आवडता छंद असून, बुद्धिबळ स्पर्धेमध्ये देशपातळीवर दुसरा क्रमांक पटकावून त्याने आपल्या बुद्धिमत्तेची छाप उमटवली आहे. याशिवाय त्याने अनेक तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवत सुवर्णपदकांची कमाई केली आहे.
त्याच्या या यशाबद्दल माजी खासदार तथा माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, बाळासाहेब पाटील खतगावकर, डॉ. सौ. मीनलताई पाटील खतगावकर, रवी पाटील खतगावकर, तसेच आदमपूर येथील माजी सरपंच तथा मार्केट कमिटी बिलोलीचे संचालक अंबादास दास शिनगारे यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
ओमकारच्या या यशामुळे आजच्या तरुण पिढीसमोर एक सकारात्मक संदेश गेला आहे—परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही.
























