मुंबई,दि. 18 जानेवारी : मुंबई महापालिकेमध्ये भाजपा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असलेतरी शिवसेना एकनाथ शिंदे गटाला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले आहे. त्यामुळे सर्व 29 नगरसेवकांना फुटण्याच्या भीतीने वांद्रे येथील हॉटेल ताज लँड मध्ये ठेवण्यात आले असल्याची चर्चा राज्यातील राजकारणात रंगली आहे. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचा इन्कार करीत नवनियुक्त नगरसेवकांची एकमेकांशी ओळख व्हावी, विचाराची देवाणघेवाण होण्यासाठी एकत्र ठेवले असल्याचा दावा केला. रविवारी त्यांनी या नगरसेवकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पत्रकारांशी ठाकरेनी आपले नगरसेवक सांभाळून ठेवण्याची काळजी करावी, जनतेच्या कोर्टात जाणाऱ्यांना मतदारांनी घरी पाठवले आहे, असा टोलाही लगावला.
227 सदस्यांच्या मुंबई महापालिकेत बहुमतासाठी 114 सदस्यांची गरज आहे. याठिकाणी महायुती करून लढताना भाजपाचे 89 तर शिंदे गटाचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे 15 सदस्य कमी असल्याने भाजपाला एकट्याच्या जीवावर बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. त्यासाठी शिंदे गटाचे नगरसेवक महत्वपूर्ण ठरणार असल्याने ते फुटू नयेत, यासाठी कालपासून सर्वांना एकत्र ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर भाजपावर दबाव टाकून जास्तीजास्त पदे मिळविण्याचीही शिंदे यांची ही खेळी असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी आज सर्व नगरसेवकांशी संवाद साधला. त्यांना
वॉर्ड विकासासाठी सत्तेचा वापर करा, कामांचे शॉर्ट, मिड आणि लाँग टर्म नियोजन ठरवा आणि मत दिले-न दिले अशा प्रत्येक नागरिकासाठी समान न्यायाने काम करा, असे निर्देश दिले. नगरसेवकांच्या कामातून शिवसेनेची प्रतिमा स्वच्छ, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख राहिली पाहिजे. नागरिकांच्या मनात नगरसेवकांविषयी एकही चुकीचा विचार निर्माण होऊ नये, हाच आपल्या कामाचा खरा निकष असावा, असे सांगून पारदर्शक कारभार आणि लोकाभिमुख कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे उपस्थित होते.






















