देगलूर : समाजातील दुर्बल, वंचित व गरजू घटकांसाठी निःस्वार्थ भावनेने सातत्यपूर्ण सेवा करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुशिक्षित बेरोजगार संस्थेच्या अध्यक्षा सौ. दिक्षा देविदास वाघमारे खानापूरकर यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जेतवन शैक्षणिक, सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान जेतवन शैक्षणिक, सामाजिक चॅरिटेबल ट्रस्ट, सुजायतपूर यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय महिला बौद्ध धम्म परिषदेत सौ. दिक्षा वाघमारे यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देऊन त्यांचा कार्याचा गौरव करण्यात आला आहे. सौ. वाघमारे ह्या समाजातील वंचित, दुर्बल व गरजू घटकांच्या सेवेसाठी त्यांनी दाखविलेली सेवाभावी वृत्ती, प्रामाणिकपणा, संवेदनशीलता व सामाजिक बांधिलकी याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
सौ. दिक्षा वाघमारे यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे संघटन करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे कार्य प्रभावीपणे केले आहे. तसेच समाजातील दुर्बल घटकांना न्याय, सन्मान व आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. आरोग्य सेवा, सामाजिक मदत, शैक्षणिक जागृती व नैतिक मूल्यांची जोपासना या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे अनेक गरजू कुटुंबांना आधार मिळाला असून समाजात सकारात्मक परिवर्तन घडताना दिसत आहे. सातत्य, चिकाटी व माणुसकीची जाणीव ही त्यांच्या कार्याची प्रमुख वैशिष्ट्ये असून कोणताही भेदभाव न करता त्यांनी सर्वांसाठी सेवा उपलब्ध करून दिली आहे.
या पुरस्कार वितरणप्रसंगी ट्रस्टच्या अध्यक्षा सावित्रीताई शेवाळकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. छायाताई बोरकर तसेच पूजनीय भंतेजी पय्याबोधी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास ट्रस्टचे पदाधिकारी, मान्यवर पाहुणे, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, सर्व स्तरांतून सौ. दिक्षा देविदास वाघमारे खानापूरकर यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील सामाजिक व सेवाभावी कार्यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
























