पंढरपूर – शहरातील जुने नगरपालिका कार्यालय, गोविंदपूरा भागातील लोकमान्य विद्यालयाची आणि सरकारी दवाखान्याची या पालिकेच्या मालकीच्या आणि या शिवाय न्यायालयाची जुनी इमारत कित्येक वर्षापासून वापरा अभावी सध्या बंद अवस्थेत आहेत. कोट्यावधी रुपये किंमतीच्या जागांवर उभ्या असलेल्या या इमारतीं भव्यदिव्य असून त्या रिकाम्या पडून राहण्यापेक्षा जर वापरात आल्या तर त्याची दूरवस्था होणार नाही. त्यामुळे या इमारतींची थोडीफार डागडूजी करुन संबंधित विभागांनी त्या भाडेतत्वावर द्याव्यात अशी मागणी शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.
शहरात चंद्रभागा नदी लगत असलेल्या गोविंदपूरा भागात नगरपालिकेच्या कार्यालयाची जूनी इमारत आहे. पूर्वी या इमारती मधूनच पालिकेचे कामकाज चालत असत. मात्र मध्यंतरीच्या काळात पालिकेने येथील मिरची बाजारा मध्ये भव्य अशी इमारती बांधली आहे. या नव्या बांधण्यात आलेल्या इमारती मधूनच सध्या पालिकेचे कामकाज सुरु आहे. मात्र जुनी इमारत ही गेल्या काही वर्षा पासून वापरा अभावी रिकामीच पडून आहे. या इमारती शेजारीच पालिकेच्या मालकीची लोकमान्य विद्यालयाची जुनी ब्रिटीशकालिन इमारत आहे. तिची देखील अवस्था अशीच काहीशी आहे.
या बरोबरच सध्या पालिकेची सरकारी दवाखान्यातील कुटुंब कल्याण विभागाची इमारत तसेच या दवाखान्याच्या परिसरात असणारा मेडिकल आँफिसरचा (अलिकडच्या काळातील मुख्याधिकारी निवासी) बंगला देखील वापरा अभावी पडून आहे. या सर्व इमारती अगदी मोक्याच्या ठिकाणांवर आहेत. या इमारतींच्या जागांचे बाजारमुल्य आज कोट्यावधी रुपयांचा घरात आहे. त्यामुळे या इमारतींची तात्पुरती डागडुजी करुन भाडेतत्वावर इतरांना त्या देता येवु शकतात.
जर या सर्व इमारती वापरात आल्या तर त्यांची नियमित स्वच्छता राखली जाईल. या शिवाय एखाद्या शाळा, महाविद्यालय तसेच खासगी भाड्याच्या जागेत सुरु असणाऱ्या एखाद्या शासकीय कार्यालयास किंवा सेवाभावी संस्थेस भाडेतत्वावर या इमारती दिल्यास त्यांची देखील बऱ्यापैकी सोय होण्यास मदत होईल.
त्यामुळे गेल्या काही वर्षापासून वापरा अभावी धुळखात पडून असणाऱ्या या इमारतींबाबत मालकीहक्क असलेल्या संबंधित विभागांनी लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेवून त्या बाबत आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.
———————————–
न्यायालयाची जुनी इमारत वापराअभावी बंद
या शिवाय येथील पंढरपूर अर्बंन बँकेच्या मुख्य कार्यालया समोरील जुन्या न्यायालयाच्या इमारतीची देखील अवस्था सध्या या पेक्षा काही वेगळी नाही. ही इमारत देखील अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. या इमारतीची जागा आणि इतर मोकळा परिसर देखील मोठा आहे. त्यामुळे ही देखील इमारत डागडूजी नंतर वापरात येवू शकते.
—————————–
भाडेतत्वावर दिल्यास मिळू शकणार उत्पन्न
डागडूजी नंतर या इमारती एखादी शाळा, महाविद्यालय, इतर शासकीय कार्यालयांना किंवा सेवाभावी संस्थांना भाडेतत्वावर देता येईल. या मधून संबंधित विभागांना थोडेफार उत्पन्न मिळून आपला महसूल देखील काही प्रमाणात वाढविता येईल.
———————–
फोटोओळी : पंढरपूर : शहरातील गोविंदपुरा भागातील पालिकेच्या कार्यालयाची जुनी इमारत तसेच न्यायलयाची पूर्वीची इमारत सध्या वापरा अभावी धुळखात उभी असल्याचे दिसत आहे.























