बिलोली – सगरोळी (ता. बिलोली) येथील संस्कृति संवर्धन मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे मंगळवार (दि. २७) व बुधवार (दि. २८) दरम्यान दोन दिवसीय ‘कृषिवेद २०२६ – कृषी तंत्रज्ञान महोत्सव व कृषी मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात विविध चर्चासत्रे, मान्यवरांचे मार्गदर्शन, यशोगाथा, प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान, पशुप्रदर्शन, तसेच शेतीविषयक माहिती व विक्रीसाठी विविध नामांकित कंपन्यांचे स्टॉल्स उपलब्ध असणार आहेत.
महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार (दि. २७) रोजी सकाळी १० वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा यांच्या हस्ते होणार असून जिल्हाधिकारी मा. राहुल कर्डिले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कृति संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख असतील.
उद्घाटनानंतर पहिल्या दिवशी प्रगतीशील शेतकरी एकनाथ साळवे हे एकात्मिक शेती विषयावर, तर मा. बालाजी लोहकरे हे भाजीपाला उत्पादन याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, बुधवार (दि. २८) रोजी सकाळी १० वाजता महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महिला मेळाव्याचे उद्घाटन बारामती येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांच्या हस्ते होणार असून यावेळी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावेली व संस्कृति संवर्धन मंडळाचे संचालक उपेंद्र देगलूरकर उपस्थित राहणार आहेत.
महिला मेळाव्यात बारामती येथील उद्योजिका श्रीमती सविता बोहरा व कृषी उद्योजक (दुग्धव्यवसाय) भगवान सावंत हे मार्गदर्शन करणार आहेत.
या महोत्सवात एकात्मिक शेती पद्धती, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेळीपालन, भाजीपाला व हंगामी पिकांची प्रात्यक्षिके, स्वयंचलित व वातावरण-अनुकूल कृषी तंत्रज्ञान, शेतीतील रोबोटिक्स व ड्रोनचा वापर, काढणीपश्चात अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान, पशु व कृषी अवजारांचे प्रदर्शन, तसेच महिला मेळावा आणि विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण कृषी प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
बदलत्या हवामान परिस्थिती व वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतीत उत्पन्नवाढ साधण्यासाठी शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. माधुरी रेवणवार यांनी केले आहे.
























