तभा फ्लॅश न्यूज/अ.नगर : भंडारदरा व निळवंडे परिसरात पर्यटनविकासातून रोजगारनिर्मिती साधण्यासाठी जलसंपदा विभागाच्या जागा अतिक्रमणमुक्त करून विकसित करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
राज्य शासनाच्या ‘हरीत महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या १० कोटी वृक्षलागवड मोहिमेत जलसंपदा विभागाने सक्रिय सहभाग घेतला आहे. या उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ भंडारदरा येथे जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या प्रसंगी आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार अमोल खताळ, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे, नाशिकचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, निळवंडे प्रकल्प अभियंता प्रदीप हापसे, गणेश हारदे आदी उपस्थित होते.
भंडारदरा धरणाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त जलसंपदा विभागामार्फत पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी तात्काळ कार्यवाहीच्या सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. विभागाच्या ताब्यातील विविध जागांची त्यांनी पाहणी करून विकासाच्या दृष्टीने सूचना केल्या.
गेल्या काही वर्षांत अतिक्रमण झाल्यामुळे विभागाच्या जागांचा उपयोग होऊ शकला नव्हता. सध्या मराठवाडा व कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील धरण परिसरातील जागा पर्यटनासाठी विकसित करण्याचे धोरण विभागाने स्वीकारले आहे. रंधाफॉल परिसरातही अशाच प्रकारे पर्यटनविकासाचे नियोजन करण्यात आले आहे.
निळवंडे धरण परिसरातील गाव रस्त्यांच्या सुधारणा, काँक्रीटीकरण व धरणग्रस्तांच्या जमिनीविषयक प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. वृक्षारोपण उपक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनाबरोबरच उच्चस्तरीय कालव्यासाठी पाणी सोडण्यात आले.