वाळूज -आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ व वाळूजचे सुपुत्र डॉ. संदेश ज्ञानोबा कादे (सनराईज हॉस्पिटल, सोलापूर व अबुधाबी) यांची प्रकट मुलाखत वाळूज प्रशाला, वाळूज येथे उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारत डॉक्टरांशी थेट संवाद साधला.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. कादे म्हणाले की, जीवनात यश मिळवायचे असेल तर कष्ट, सातत्य आणि प्रामाणिकपणा अत्यंत महत्त्वाचे आहेत. अडचणी येतातच; मात्र त्या अडचणींवर मात करून पुढे जाण्याची जिद्द ठेवली तर यश निश्चित मिळते.
विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, चांगले शिक्षण घ्यावे आणि आपल्या गावाचे, समाजाचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे. आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या मातृभूमीची आणि आपल्या शाळेची ओळख कधीही विसरू नये, असा संदेशही त्यांनी दिला.
हा कार्यक्रम शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता वाळूज प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक व क्रीडा स्पर्धांमधील यशाबद्दल बक्षीस वितरण करण्यात आले.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने भगवंत नेत्र रुग्णालय, बार्शी यांच्या वतीने अत्याधुनिक यंत्रांच्या साहाय्याने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन व नेत्र आरोग्याविषयी माहिती देण्यात आली. गावातील अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी तानाजी कोल्हाळ, जनार्धन कादे, युवराज कादे, अमोल कादे, सोपान काकडे, उत्कर्ष मोटे, अजित कादे, अनिकेत कादे, यशवंत घाडगे, मोहन कादे, नाना कदम, मुख्याध्यापक पाटील, शिक्षक, कर्मचारी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संजय राजगुरु यांनी केले, सूत्रसंचालन गुरुराज कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन बोधले यांनी केले.


























