पराभव झाला म्हणून तुम्ही अशी हाराकिरी करणार असाल तर मी घरीच बसून राहीन, अशी भावनिक साद भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना घातली आहे. पराभवाचा धक्का सहन न झाल्याने त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी टोकाची पावले उचलली. आत्महत्या केलेल्या तरुणांच्या घरी जाऊन पंकजा त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत आहेत.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने बीड आणि लातूर जिल्ह्यातील अनेक तरुणांनी त्यांची जीवनयात्रा संपवली. पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आवाहन करूनही आत्महत्येचे सत्र थांबत नाही. त्यामुळे पंकजा मुंडे गावागावात जाऊन हात जोडून, पदर पसरून कळकळीने समाजाला विनंती करत आहेत.
राजघराण्यात जन्म झाला असता तर अशी वेळ आली नसती
देवाने भाग्य लिहिताना कठीण लिहिलंय, राजघराण्यात जन्म झाला असता तर अशी वेळ आली नसती परंतु एका पराभवाने सगळे संपते का? असा सवाल करीत पराभव झाला म्हणून तुम्ही अशी हाराकिरी करणार असाल तर मी घरीच बसून राहीन, अशी भावनिक साद पंकजा यांनी समर्थकांना घातली.
लोकांनी घरी बसण्यासाठी मला मते दिली आहेत का?
कुटुंबियांनी लेकरांकडे लक्ष द्यावे. किंबहुना मला वचन द्यावे, अशी चुकीचे पावले आता कुणीही उचलणार नाही. अरे किती मतरुपी आशीर्वाद मिळालेत मला…? या देशातील सर्वाधिक पाच उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या तुलनेत मला मते मिळाली आहेत, लोकांनी घरी बसण्यासाठी मला मते दिली आहेत का? असे सवाल विचारून पंकजांनी समर्थकांना कळकळीचे आवाहन केले.