सोलापूर – अभ्यासक्रमासोबतच प्रत्यक्ष अनुभवातून मिळणारी उद्यमशीलता, सर्जनशीलता, नेतृत्वगुण आणि व्यावसायिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने भविष्यातील आव्हानांना सामोरे जातात, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव व क्रीडा संचालक डॉ. अतुल लकडे यांनी केले.
वालचंद शिक्षण समूहातील हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स आणि वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त वैभव गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘कॉमर्झ अरेना – द फूड फेस्टिव्हल–०८’ या भव्य उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. लकडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, फीत कापून तसेच रंगीत फुगे आकाशात सोडून या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त पराग शहा, प्राचार्य डॉ. सत्यजित शहा, प्राचार्य डॉ. संतोष कोटी, प्राचार्य डॉ. अश्विन बोन्दार्डे, एच.एन.सी.सी. – एमबीए विभागप्रमुख डॉ. प्रीतम कोठारी यांच्यासह प्राध्यापकवृंद, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
या फूड फेस्टिव्हलमध्ये महाविद्यालयातील सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी उभारलेल्या तब्बल ७८ आकर्षक दालनांमधून नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थ, प्रभावी जाहिरात संकल्पना आणि सर्जनशील सजावटीच्या माध्यमातून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमास ६ ते ७ हजार खवय्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध चविष्ट पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला.
कॅफे हटचे संदीप गांधी आणि नट्सचे भावेश शहा यांनी सर्व दालनांना भेट देऊन पदार्थांची चव चाखली. ‘इनोव्हेटिव्ह डिश’, ‘बेस्ट अॅडव्हर्टाइजमेंट’, ‘क्रिएटिव्ह बॅनर’ आणि ‘बेस्ट स्टॉल’ या विविध प्रकारांतील विजेत्यांची त्यांनी घोषणा केली. भेळ, शेवपुरी, पाणीपुरी, चायनीज भेळ, मंचुरियन, बास्केट चाट, सोलापुरी हुरडा, सिझलिंग पायनॅपल, मोनॅको डिलाईट, चीज गार्लिक पाव, आंध्र भजी, मोहिटो, मेल्टेड मॅजिक केक, कोल्ड कॉफी, इटालियन सँडविच आदी पदार्थ विशेष आकर्षण ठरले.
नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे विद्यार्थी घडावेत या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्यमशीलतेचा मौल्यवान अनुभव मिळाला. उत्पादन नियोजन, खर्च व्यवस्थापन, ग्राहकसंवाद, विक्री आणि जाहिरात यांसारखी व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी भविष्यातील सक्षम उद्योजक म्हणून घडण्याचा मार्ग अधिक दृढ होत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

















