देगलूर : तालुक्यातील कावळगाव येथील दलित मित्र पुरस्कार प्राप्त स्वर्गीय मष्णाजी मरीबा वाडेकर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त वाडेकर कुटुंबीय व रुषा मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व औषधी वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा करडखेड परिसरासह विविध गावांतील तब्बल 270 रुग्णांनी लाभ घेतला. विशेष म्हणजे स्व. मष्णाजी वाडेकर यांचे पुण्यस्मरण माणुसकी वारसा जोपासणारे ठरले.
या आरोग्य शिबिरात कावळगाव, बळेगाव, ढोसणी, भोकसखेडा, बोरगाव, सांगवी (कं), चाकूर, गवंडगाव आदी गावांतील रुग्णांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. महिलांच्या आरोग्यविषयक तपासण्या, रक्तदाब व मधुमेह तपासणी, रक्ततपासणी तसेच आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे रुग्णांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण दिसून आले.
स्वर्गीय मष्णाजी वाडेकर यांनी आपल्या आयुष्यात सामाजिक कार्याचा वसा जपला. त्यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिक्षणाची प्रेरणा दिली, शेतकरी, महिला व तरुणांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविले. कावळगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच तसेच सेवा सहकारी सोसायटीचे संचालक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. शिक्षणावर असलेल्या त्यांच्या दृढ विश्वासामुळे आज वाडेकर कुटुंबात तब्बल आठ ते दहा डॉक्टर घडले आहेत. राजकीय व सामाजिक क्षेत्रात मारोती वाडेकर यांचे नाव उल्लेखनीय असून, हाणमंत वाडेकर हे प्रशासनात महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत.
या शिबिरात डॉ. गणपत वाडेकर (कान-नाक-घसा तज्ञ), डॉ. सौ. दिपाली वाडेकर (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. सुशिल वाडेकर (अस्थिरोग तज्ञ), डॉ. आशिष वाडेकर (पोटरोग तज्ञ), डॉ. गणपत हुल्लाजी वाडेकर (तालुका वैद्यकीय अधिकारी, बिलोली), डॉ. निशा वाडेकर व डॉ. कोमल वाडेकर (दंतरोग तज्ञ), डॉ. हर्षल वाडेकर (जनरल फिजिशियन), डॉ. मेघा वाडेकर (आयुर्वेद तज्ञ) आदी डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली.
याप्रसंगी मारोती वाडेकर (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट), बाळासाहेब देशमुख (उपसरपंच, ग्रा.पं. कावळगाव), मारोती शिरगिरे (माजी सरपंच), माधव वाडेकर (माजी सरपंच), सकाराम वाडेकर, हाणमंत वाडेकर (विस्तार अधिकारी, जि.प. नांदेड), विनायक वाडेकर, प्रा. मनिष वाडेकर, मिलिंद कावळगावकर (शिवसेना – एकनाथ शिंदे गट), संग्राम सोनकांबळे, डॉ. समीर अंकमवार आदी मान्यवर उपस्थित होते. या आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मरखेल आरोग्य विभागातील मनोज सोनकांबळे (आरोग्य सेवक), एस.सी. कांबळे (परिचारिका), लक्ष्मण मोतेकर, आकाश जोगदंड, ज्ञानेश्वर बिरादार, सरस्वती फुलारी, आर.डी. झुडपे आदींनी मोलाचे सहकार्य केले.

























