सोलापूर : ज्येष्ठ नागरिकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूरातील रेल्वे लाईन परिसरातील हृदयम हॉस्पिटलतर्फे ‘हेल्थ कार्ड’ ही विशेष योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेचा शुभारंभ रविवार, २९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता नव्या युनिटच्या उद्घाटन सोहळ्यात होणार आहे.
हॉस्पिटलच्या नवीन युनिटचे उद्घाटन श्रीशैल जगद्गुरू डॉ. चन्नसिध्दराम शिवाचार्य महास्वामीजी व काशी जगद्गुरूं डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात तसेच राज्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी डॉ. शैलेशकुमार पाटील फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘हेल्थ कार्ड’ योजनेची औपचारिक सुरुवात करण्यात येणार आहे.
गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या हृदयम हॉस्पिटलने अनेक रुग्णांना नवजीवन दिले असून, वाढत्या गरजा लक्षात घेऊन विद्यमान इमारतीलगत आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे नवीन युनिट उभारण्यात आले आहे. या युनिटमध्ये अत्याधुनिक सीटी स्कॅन मशीनसह विविध तपासणी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. साधारणपणे ईसीजी, हृदयाची सोनोग्राफी, छातीचा एक्स-रे, रक्त तपासणी (सीबीसी), रक्तातील साखर तसेच सीटी स्कॅन या तपासण्यांसाठी सुमारे साडेचार हजार रुपये खर्च येतो. मात्र, ‘हेल्थ कार्ड’धारक ज्येष्ठ नागरिकांना या सर्व तपासण्या केवळ ५०० रुपयांत उपलब्ध करून देण्याचा निर्णय हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर शैलेश पाटील यांनी घेतला आहे. याशिवाय अँजिओग्राफीवर ५० टक्के सवलत तसेच औषधांवर ३० ते ५० टक्के सवलत देण्यात येणार असल्याचेही डॉ.पाटील यांनी सांगितले.
या उद्घाटन सोहळ्यास माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, खासदार अजित गोपछडे,आमदार विजयकुमार देशमुख, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, सुभाष देशमुख, माजी मंत्री बसवराज पाटील, माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, महापौर विनायक कोंड्याल, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, पक्षनेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


























