तभा फ्लॅश न्यूज/ वाशी : जुलै महिन्याच्या अखेरीस शेवटी पावसाने दमदार हजेरी लावत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं आहे. बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आलेल्या या पावसामुळे तेरखेडा मंडळातील शेतकऱ्यांनी मोठा निश्वास टाकला आहे. विशेषतः सोयाबीन पिकांची चिंता आता थोडीशी कमी झाली असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
यंदा मे महिन्याच्या सुरुवातीला पावसाने आगमन करून आशा पल्लवित केल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर आदी पिकांची वेळेवर पेरणी केली होती. मात्र नंतर पावसाने दडी मारल्याने पिकांवर ओढ पडली. शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरने पाणी देणे, कोळपणी, खुरपणी, फवारण्या यासाठी मोठा खर्च केला. कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिकच कठीण बनली होती.
वाशी तालुक्यात पावसाने जोरदार पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला असून उभ्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. सोयाबीनच्या जोमाने वाढ होण्याची शक्यता असून पीक उत्पादनात सुधारणा होईल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.
शेतकरी वर्गाने मात्र शासनाकडून यंदा योग्य सल्ला, पीक विमा आणि बाजारभाव नियंत्रणासंबंधी ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे. “पाऊस झाला, पण खर्च वाढलाय, भाव मिळाले पाहिजेत,” अशी भावना अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत. तरीही, सध्या तरी पावसाच्या या आगमनामुळे शेतकऱ्यांना हळूहळू दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे.