पंढरपूर – शहरामधुन सुरु असलेली जडवाहतूक त्वरीत बंद करुन ती बायपास किंवा रिंगरुट रस्त्यावरुन करावी अन्यथा भाजपाकडून लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा भाजपाचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक विक्रम शिरसट (पापरकर) यांनी दिला.शहरातून होणारी जड वाहतूक बंद करावी या संदर्भात त्यांनी शहरपोलिसांना नुकतेच एक निवेदन दिले आहे.
दरम्यान शहराध्यक्ष शिरसट (पापरकर) यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात नमूद केलेले आहे की,पंढरपूर शहरामध्ये वाढते यात्रेकरू (वारकरी) व वाढती लोकसंख्या पाहता वाहतूक व्यवस्थेची फार अडचण होत आहे. त्यामुळे शहरात दिवसेंदिवस अपघाताची संख्याही वाढली आहे. नुकतेच एका शाळकरी मुलीचा टिपरच्या धडके मध्ये मृत्यु झाला आहे. त्यामुळे पंढरपूर शहरामध्ये येणाऱ्या प्रमुख रस्त्यावरुन होणारी जड वाहतूक बंद करून ती शहराबाहेरील रिंगरूट किवा बायपास रस्त्याने सक्तीने सुरु करावी. त्यासाठी आपण योग्य व कडक कार्यवाही करावी जेणेकरून भविष्यात होणारे अपघात टाळता येतील.
जर आपणाकडून या मागणीची त्वरीत दखल घेतली गेली नाही तर आम्हाला लोकशाही मार्गाने या मागणीसाठी आंदोलन करावे लागेल असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात शहर पोलिसांकडून शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन होणाऱ्या जड वाहतूकीबाबत कोणता निर्णय घेतला जातो याबाबतची उत्सुकता आता शहरवासियांना लागून राहिलेली आहे. यावेळी नगरसेवक सौरभ थिटे पाटील देखील उपस्थित होते.



























