सोलापूर – केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार रस्ता सुरक्षा अभियान–२०२६ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सोलापूर शहरात हेल्मेट व सीट बेल्ट जनजागृती रॅली यशस्वीरीत्या संपन्न झाली.
प्रादेशिक परिवहन कार्यालय येथून दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.१५ वाजता रॅलीस प्रारंभ झाला. या रॅलीचे उद्घाटन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी असिफ मुल्लाणी यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे वाहतूक नियमांचे पालन वाढून जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.
रॅलीचा मार्ग प्रादेशिक परिवहन कार्यालय, कंबर तलाव, सात रस्ता, रेल्वे स्टेशन, भैय्या चौक, रामलाल चौक, पार्क चौक, डफरीन चौक, रंगभवन, गांधी नगर, होटगी रोड, आसरा चौक, डी-मार्ट, दावत चौक, भारती विद्यापीठ मार्गे पुन्हा प्रादेशिक परिवहन कार्यालय असा होता.
या रॅलीमध्ये परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी, ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी तसेच बाईकर्स ग्रुप सोलापूरचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वाहन चालविताना हेल्मेट व सीट बेल्टचा नियमित वापर करावा, वेगमर्यादेचे पालन करावे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी नागरिकांना केले.






















