वैराग – पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी आणि सर्वधर्मसमभावाची जोपासना करण्यासाठी ‘एकता महिला मंच’ आणि बार्शीच्या नवनिर्वाचित नगरसेविका सायरा मुल्ला यांच्या विशेष सहकार्यातून आज कारी (ता. बार्शी) येथे गरजू महिलांना खाद्यपदार्थांच्या (किराणा) किटचे वाटप करण्यात आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या विधवा व गरजू महिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी ‘एकता महिला मंच’च्या वतीने उपस्थित पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. बार्शी शहरात प्रथमच सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख निर्माण केलेल्या आणि नुकत्याच नगरसेविका पदी निवड झालेल्या सायरा मुल्ला यांचा एकता महिला मंचच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला.
संकल्पना आणि आयोजन
हा उपक्रम एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. रमजानच्या पवित्र काळात मुस्लिम बांधवांचे रोजे (उपवास) सुरू असतात. ही बाब लक्षात घेऊन अत्यंत गरीब व गरजू महिलांना घरगुती वापराच्या वस्तूंचे किट देण्यात आले. नगरसेविका सायरा मुल्ला यांनी या महिलांना प्रत्यक्ष किट वाटप केले, तसेच दूध व इतर खर्चासाठी रोख आर्थिक मदतही केली.
“एकता महिला मंचच्या माध्यमातून विधवा आणि ज्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे अशा महिलांना मदत करण्याचे भाग्य मला लाभले, हे मी माझे कर्तव्य समजते. अशा विधायक कार्याला माझे नेहमीच पाठबळ राहील.”
— सायरा मुल्ला, नगरसेविका, बार्शी
उपस्थितांची मांदियाळी
या कार्यक्रमाला एकता महिला मंचच्या रेखा विधाते, नूरजहाँ शेख प्रमिला जाधव, प्रतिभा जगदाळे, कलीमा मुलाणी, मुस्कान मुलाणी, स्वाती व्हटकर, ताहीरा मुलाणी, यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक: कलीमा मुलाणी यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.
सूत्रसंचालन: प्रतिभा जगदाळे यांनी केले.
आभार प्रदर्शन: प्रभाकर क्षीरसागर यांनी मानले.
एकतेचा संदेश
“हा उपक्रम केवळ मदत नसून सर्वधर्मसमभाव आणि माणुसकी टिकवण्याचा एक प्रयत्न आहे,” असे मत प्रभाकर क्षीरसागर यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित महिला सदस्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत एकता महिला मंचच्या कार्याचे कौतुक केले. या मदतीमुळे रमजानच्या काळात अनेक गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे.























