पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मनोज जरांगे यांनी आजपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांनी उपोषण करणारच असा ठाम निर्धार केला आहे. आरक्षण दिलं नाही, तर विधानसभेला २८८ उमेदवार उभे करेन. विधानसभेला नाव घेऊन उमेदवार पाडणार. मी विधानसभेला उभे राहणार नाही. गोरगरिबांना उभे करणार. सरकारला आंदोलन मोडीत काढायचं आहे. कारण नसताना मला परवानगी नाकारली. पण, आंदोलन मागे घेणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
जरांगे म्हणाले की, पोलिसांनी नाही तर सरकारने परवानगी नाकारली आहे. इतके दिवस सरकारचा सन्मान केला. आचारसंहिता असल्यामुळे उपोषण पुढे ढकललं होतं. आता आम्हाला सगे-सोगऱ्यांचा कायदा हवा आहे. गरिबांना वेठिस धरलं जात आहे. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीवेळी गर्दी होते, म्हणून शपथविधी सोहळा रद्द करणार का? असं होत नसतं. आम्ही उपोषण करणारच आहे. जिल्हाधिकाऱ्यांना कोणी निवेदन दिलं हे मला माहिती आहे. इतके दिवस कायद्याचे पालन केले. म्हणूनच उपोषण पुढे ढकलले होते. आता सरकारने कायद्याचे पालन करावे. दोघांंनी कायद्याचे पालन करायला हवे. मला राजकारणात पडायचं नाही. आमच्या मागण्या मान्य करा एवढीच आमची मागणी आहे. शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आमचा त्यांच्यावर अजूनही विश्वास आहे, असं जरांगे म्हणाले.
शेतकऱ्यांनी उपोषण स्थळी येऊ नये. शेतीची कामे सुरु आहेत. आपल्यासाठी शेती महत्त्वाची आहे. मी एकटा याठिकाणी पुरेसा आहे. यावेळी आंदोलनाचा कोणताही कार्यक्रम नाही. आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरु ठेवणार आहे. सरकारला खूप वेळ दिला. आता यापुढे वेळ देणार नाही. आचारसंहिता, कायद्याचा सन्मान केला. आता समाजाचा विषय आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.