बार्शी – तालुक्यातील गौडगाव येथे इफ्तार पार्टीचे आयोजित करण्यात आले होते. इफ्तार पार्टी ही केवळ उपवास सोडण्याची धार्मिक परंपरा नव्हे, तर समाजातील एकात्मतेचा सुंदर संदेश देणारा सोहळा ठरला. या कार्यक्रमाला गौडगाव येथील लोकप्रतिष्ठा विचार मंच अध्यक्ष राहुल भड तसेच हिंदू समाजातील अनेक बांधव उपस्थित राहिले होते.
सर्वजण एकत्र बसून साधेपणाने इफ्तार करताना धर्म, जात, पंथ या सगळ्या भेदांना बाजूला ठेवून :एकत्र येण्यातच खरा आनंद आहे’ हेच जणू प्रत्यक्षात अनुभवायला मिळाले. या प्रसंगी उपस्थितांनी परस्परांशी संवाद साधत आपुलकी वाढवली आणि सामाजिक सौहार्दाचा आदर्श निर्माण केला.
अशा प्रकारचे उपक्रम समाजात एकोप्याची भावना दृढ करतात आणि ‘एकता हाच खरा धर्म’ हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवतात. गौडगावातील ही इफ्तार पार्टी म्हणजे सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे उत्तम उदाहरण ठरले. यावेळी पंचायत समितीचे सदस्य संजय भड, कुमार पाटील, पांडुरंग पाटील, सतीष भड, युवराज काजळे, बालाजी भड, सुशांत सुरवसे, विनोद सोनवणे, जयवंत सुरवसे, आदेश यादव, सुरेश आरगडे तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















