सोलापूर : भरधाव कारने कंटेनरला मागून धडक दिल्याने सोलापुरातील विजापूर रोड परिसरात भीषण अपघात झाला. यामध्ये दोघा मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इमामउद्दीन झियाउल्ला बागवान (वय 19) आणि अमान निसार बागवान (वय 20, दोघे राहणार रंगराज नगर, हैदराबाद रोड, सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. इफ्तारनंतर कार घेऊन फेरफटका मारण्यासाठी आणि चहा घेण्यासाठी ते बाहेर पडले होते. या घटनेनंतर शहरात हळहळ व्यक्त होतेय.
मिळालेल्या माहितीनुसार, इमामउद्दीन हा मूळचा तेलंगणाचा तर अमान हा सातारा जिल्ह्यातील होता. शिक्षण व कामानिमित्त दोघेही सोलापुरातील रंगराज नगर येथे वास्तव्यास होते. दोघांमध्ये जिवलग मैत्री होती. शुक्रवारी रोजा इफ्तार केल्यानंतर ते कार (एमएच 13 EK 7609) घेऊन पुणे रोडवरील लांबोटी येथे चहा पिण्यासाठी गेले. चहा घेतल्यानंतर थोडा वेळ फिरण्यासाठी ते पुणे-विजापूर बायपास मार्गाने विजापूर रोडच्या दिशेने निघाले.
भरधाव वेगाने जात असताना त्यांच्या कारने समोरून जाणाऱ्या टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघाताची भीषणता एवढी होती की, कारचा पुढील भाग चक्काचूर झाला. पुढील सीटवर बसलेले दोघे मित्र गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच मित्र आणि नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. अचानक झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहे.


























