सोलापूर – महानगरपालिका निवडणुकीचे धक्कादायक निकाल समोर येत आहेत. भाजपने एकहाती सत्तेची घोडदौड सुरूच ठेवली आहे. भाजप सुसाट वेगाने पुढे जात असताना प्रभाग 14 मध्ये ब्रेक लावण्याचं काम एमआयएमने केले आहे. मुस्लिम बहुल मतदारसंख्या असलेल्या प्रभागात प्रभाग 14 मध्ये एमआयएमचे सर्व पॅनल विजयी झाले आहेत. प्रभाग 8, 9 व 14 च्या प्रत्येकी तीन फेऱ्या झाल्या. तिन्ही फेऱ्यांचा निकाल लागताच दोन्ही पक्षांकडून जल्लोष करण्यात आला.
प्रभाग आठ, नऊ व 14 ची मतमोजणी ही शासकीय तंत्रनिकेतन अक्कलकोट रोड येथे होती. सकाळी दहा वाजताच्या सुमारास मतमोजणी प्रतिज्ञा घेत सुरुवात करण्यात आली. 14 प्रभागात एमआयएम चे पॅनल आल्यानंतर उमेदवाराचे भाऊ व सहकाऱ्यांनी मिळून मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. हा जल्लोष करत असताना रस्त्याची वाहतूक बंद झाल्याने पोलीस प्रशासनाकडून सौम्य लाठीचार्ज करत जमाव पांगण्याचे काम केले व आव्हान केले की वाहतुकीस अडथळा होऊ देऊ नका.
प्रभाग आठ मध्ये अमर पुदाले, गीता गवई, बबिता धूम्मा, प्रवीण दर्गोपाटील, प्रभाग नऊ मध्ये शेखर इगे, कादंबरी मंजेली, पूजा वाडेकर, मेघना येमूल आणि प्रभाग चौदा मध्ये अजहर हुंडेकरी, अजहर जहागीरदार, सफिया चौधरी, अनिसा मोगल यांचा विजय झाला.
निवडून येईल असं वाटलं नव्हतं
उच्च शिक्षित असलेल्या अनिसा मोगल यांनी पहिल्यांदाच नशीब अजमावले होते. कोणत्याही राजकीय परिस्थितीचा वारसा नसलेल्या अनिसा मोगल यांनी माध्यमां समोर प्रतिक्रिया दिली. निवडून येईल असं वाटलं नव्हतं, कारण अनेक दिगग्ज नेते आमच्या समोर होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेक सभा घेत मुस्लिम मतदारांची दिशाभूल केली. त्यातून एमआयएमच्या संपूर्ण पॅनलचा विजय झाला म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले. अनिसा मोगल या पोलीस पत्नी आहेत. त्यांनी विजयानंतर पतीला व्हिडीओ कॉल करत ही बातमी दिली.
आमचा हा विजय आमदार देशमुखांमुळेच झाला
प्रभाग आठ मध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांनी भरघोस निधी दिला. त्या निधीमुळे मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली. छोट्या छोट्या कामांना देखील आमदार विजयकुमार देशमुख यांनी निधी देऊन नागरिकांच्या समस्या सोडविल्याने आमचा हा विजय झाला आहे. नागरिकांनी आम्हाला चांगल्या मतांनी निवडून दिल्यामुळे आम्ही आभार मानतो.
– अमर पुदाले

























