सोलापूर – ‘जागतिक क्षयरोग दिना’निमित्त जिल्हाभर विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर ‘आयुष्यमान आरोग्य अभियान’ अंतर्गत १०० दिवसांच्या विशेष मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात क्षयरोग निर्मूलनासाठी योगदान देणाऱ्या ‘निक्षय मित्रां’ना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच क्षयरुग्णांना पोषण आहार किट (फूड बास्केट) वितरित करण्यात आले.
मार्डी येथे संशयित रुग्णांची तपासणी करून एक्स-रे काढण्यात आले. याशिवाय जिल्हाभर रॅली, रांगोळी स्पर्धा, आयुष्यमान आरोग्य शिबिरे अशा विविध उपक्रमांद्वारे क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी ‘क्षयमुक्त भारत’ करण्याची सामूहिक शपथ घेतली.
चालू वर्षात जास्तीत जास्त संशयित रुग्णांचा शोध घेऊन त्यांना उपचाराखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच समाजातील विविध घटक, संस्था आणि औद्योगिक क्षेत्रांनी पुढाकार घेऊन क्षयरुग्णांना ‘फूड बास्केट’ देण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले. सोलापूर जिल्हा क्षयमुक्त करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षमपणे कार्यरत असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. संतोष नवले, सहसंचालक (कुष्ठरोग) डॉ. मोहन शेगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एवळे (उत्तर) व डॉ. निलम घोगरे (दक्षिण), तसेच डॉ. विनोद अभिमान, डॉ. सरोजा बनसोडे यांच्यासह जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी, कर्मचारी, निक्षय मित्र आणि क्षयरुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























