सोलापूर : भावसार व्हिजन सोलापूर क्लबचे नूतन अध्यक्ष आशिष जवळकर, सचिव हर्षल माळवदकर आणि नूतन पदाधिकारी यांचा “पदग्रहण सोहळा” सोमवार दि. 26 जानेवारी 2026 रोजी डफरीन चौक येथील इंडियन मेडिकल असोसिएशन च्या हॉलमध्ये उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय अध्यक्ष मनीष सुत्रावे, एरिया गव्हर्नर श्रीराज निकते, समाज अध्यक्ष राजकुमार हंचाटे, नॅशनल प्रेसिडेंट 2027 शिवाजी उपरे, नॅशनल सेक्रेटरी 2027 गिरीश पुकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्री हिंगलाज माता पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. प्रारंभी माजी अध्यक्ष विशाल खमितकर यांनी सोहळ्याची प्रस्तावना केली आणि सर्व उपस्थितांचे स्वागत केले.
सर्वप्रथम नॅशनल प्रेसिडेंट श्री. मनीष सुत्रावे यांनी एरिया गव्हर्नर श्रीराज निकते यांना गव्हर्नर पदाची व गोपनीयतेची शपथ दिली.
एरिया गव्हर्नर श्रीराज निकते यांनी नूतन अध्यक्ष आशिष जवळकर, सचिव हर्षल माळवदकर आणि नूतन पदाधिकाऱ्यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. तदनंतर मावळते अध्यक्ष विशाल खमितकर यांनी नूतन अध्यक्ष आशिष जवळकर यांना संस्थेचे चार्टर आणि अध्यक्ष पदाचे कॉलर सुपूर्द केले.
त्यानंतर नॅशनल प्रेसिडेंट 2027 श्री. शिवाजी उपरे यांनी क्लब मध्ये नव्याने सामील झालेल्या 18 नूतन सदस्यांना शपथ दिले व क्लब मध्ये पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले व नूतन कार्यकारिणीला पुढील सेवा कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मावळते अध्यक्ष विशाल खमितकर यांनी पीपीटी द्वारे मागील वर्षाचा आढावा सादर केला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात नूतन अध्यक्ष आशिष जवळकर यांनी 2026 मध्ये वर्षभरात भावसार समाजासाठी अनेक सेवाभावी नवनवीन प्रकल्प राबविणार असल्याचे ही सांगितले.
प्रमुख पाहुणे समाज अध्यक्ष श्री. राजकुमार हंचाटे म्हणाले की, या क्लबच्या माध्यमातून भावसार समाजातील गरजूंना मिळणारी मदत ही खूप अनमोल आहे. विविध उपक्रमाच्या माध्यमातून देऊ केलेला मदतीचा हात हा गरजूंना खरोखर आधारवड आहे.
एरिया गव्हर्नर श्रीराज निकते म्हणाले की, या क्लबचा एक सदस्य ते एरिया गव्हर्नर पर्यंतचा प्रवास हा जीवनामध्ये खूप अमुलाग्र बदल घडवणारा होता. आपला व्यवसाय किंवा नोकरी सांभाळत समाजसेवेसाठी झटणाऱ्या या क्लबच्या टीमला पाहिले की नवी ऊर्जा निर्माण होते.
राष्ट्रीय अध्यक्ष मनीष सुत्रावे म्हणाले की, व्हिजनचे पॅटर्न खूप मौलिक आहे. व्हिजन च्या बायलॉज प्रमाणे कार्य करत असताना शिस्त, अनुशासन याची प्रचिती येते. जीवनामध्ये एखादा व्यक्ती किती मोठ्या पदावर आहे, यापेक्षा तो समाजातील गरजू घटकाला किती मदत करतो यावरून त्या व्यक्तीची श्रेष्ठता ठरते.
क्लबच्या कार्याची माहितीने परिपूर्ण अशा क्लबच्या “झेप” या बुलेटिनचे पहिल्या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नूतन अध्यक्ष आशिष जवळकर यांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार केला.
यावेळी भावसार समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन गव्हर्नर सेक्रेटरी संतोष पुकाळे यांनी केले, तर सचिव हर्षल माळवदकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

























