किनवट : किनवट–माहूर विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “बळीराजा शेत पानंद रस्ते विशेष अभियाना”चा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या विशेष अभियानाचे उद्घाटन मा. श्री. भिमरावजी केराम साहेब, आमदार किनवट–माहूर विधानसभा मतदारसंघ यांच्या हस्ते करण्यात आले.
या अभियानाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी पक्क्या व सर्वहंगामी रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. याअंतर्गत पानंद रस्त्यांचे सर्वेक्षण, नकाशांकन व पुनर्स्थापना करण्यात येणार असून, अतिक्रमणमुक्त शेत रस्त्यांसाठी स्वतंत्र विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
या अभियानामुळे शेतमाल वाहतुकीसाठी लागणारा वेळ व खर्चात लक्षणीय बचत होणार आहे. पावसाळ्यातही शेतात जाण्यास अडथळे येऊ नयेत, यासाठी सर्व ऋतूंमध्ये वापरता येतील असे रस्ते विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच ग्रामस्तरावर शेत रस्त्यांचा समन्वयित व नियोजनबद्ध विकास साधण्यात येणार आहे.
कृषी यंत्रसामग्रीचा वापर सुलभ होऊन आधुनिक शेतीला चालना मिळेल. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी मजबूत पायाभूत सुविधा निर्माण होणार असून, गावाच्या सर्वांगीण विकासात शेत रस्त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
या कार्यक्रमप्रसंगी बोलताना मा. आमदार भिमरावजी केराम साहेब यांनी सांगितले की, शेतकरी आणि प्रशासन यांच्या परस्पर समन्वयातून या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी केली जाईल. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून त्यांचे जीवनमान उंचावणे हेच या अभियानाचे अंतिम ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या उद्घाटनप्रसंगी आमदार भिमराव केराम यांचे स्वीय सहाय्यक श्री. प्रकाश कुडमते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विशेष अभियानामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी दूर होऊन ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
























