बार्शी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित, राजर्षी शाहु लॉ कॉलेज, बार्शी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत मौजे अलीपूर येथे आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
‘शाश्वत विकासाच्या दिशेने युवकांची भूमिका : जलसंधारण व्यवस्थापन व पडीक जमीन विकास’ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर हे शिबीर दि. २३ ते २९ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
शिबिराचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. माया मीठ्ठा यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विशद करताना, विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता समाज आणि राष्ट्राच्या उभारणीसाठी कार्य करावे, असे आवाहन केले.
शिबिराचे उद्घाटन सरपंच श्री.अशोक मुंढे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ एक उपक्रम नसून ती विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारी चळवळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रत्नदीप सोनकांबळे हे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांनी शिबिराच्या माध्यमातून गावात जाऊन लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवावा आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवावा, असे प्रेरणादायी आवाहन केले. युवकांच्या ऊर्जेचा योग्य दिशेने वापर झाला तर देशाचा शाश्वत विकास निश्चित साध्य होऊ शकतो.
या उद्घाटन समारंभास उपसरपंच, कृषी अधिकारी, ग्रामसेवक, सर्व अलीपुर गावचे सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड, दळवी, महाविद्यालयातील आय.क्यू.ए.सी.समन्वयक प्रा. शिकारे मॅडम, प्रा.कुलकर्णी मॅडम, सुरवसे मॅडम, हरदडे मॅडम, साखरे मॅडम, प्रा. शेख, खोत, तायडे, वडणे, कार्यालयीन कर्मचारी गव्हाणे, वाघे, शेळके, माने, कोल्हे, ठोंबरे उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे एकूण ५० स्वयंसेवक या शिबिरात सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक डॉ. दत्तप्रसाद सोनटक्के यांनी प्रभावी व संयोजित पद्धतीने केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. समाधान काळे यांनी मांडले.
या सात दिवसांच्या शिबिरामध्ये जलसंधारण, पडीक जमीन विकास, ग्रामस्वच्छता, वृक्ष लागवड , मतदार जनजागृती, योगाचे महत्त्व प्रशिक्षण व सामाजिक बांधिलकी जोपासणारे विविध उपक्रम राबविण्यात येणार असून या माध्यमातून युवकांमध्ये राष्ट्रनिर्माणाची जाणीव अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

























