सोलापूर – राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रक्कमेत वाढ करण्याच्या मागणीला अखेर यश मिळाले असून येत्या शैक्षणिक वर्षापासून शिष्यवृत्ती रक्कम वाढविण्यात येणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी विधानपरिषदेत केली. या निर्णयामुळे राज्यातील हजारो मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. यासाठी त्यांनी तत्कालीन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची समक्ष भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्येकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर राज्यपालांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सचिवांना या संदर्भात विशेष सूचना दिल्या होत्या. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर तसेच समाजकल्याण विभागाचे आयुक्त (पुणे) यांचीही सचिन शिंदे यांनी भेट घेऊन मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वाढीचा प्रस्ताव सादर करत सातत्याने पाठपुरावा केला होता.
राज्यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी भारत सरकारच्या शिष्यवृत्तीच्या आधारावर शिक्षण घेत आहेत. शेतकरी, मोलमजुरी करणारे व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण हे प्रामुख्याने शिष्यवृत्तीवर अवलंबून आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाचा खर्च वाढत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण होत असल्याचे संस्थेने शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.
या मागणीची दखल घेत सामाजिक न्याय विभागाने सकारात्मक निर्णय घेतला असून येत्या शैक्षणिक वर्षापासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रक्कमेत वाढ करण्यात येणार आहे. हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल प्रयास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे आभार मानले आहेत.

























