भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिका संपली आहे. या मालिकेतून टीम इंडियाला एक नवा हिरा मिळाला आहे, जो टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी नवा मॅचविनर ठरू शकतो.
विश्वचषकानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० मालिका सुरू होती. ही मालिका संपली असून भारताने ४-१ अशा फरकाने जिंकली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना ३ डिसेंबर रोजी बेंगळुरू येथे खेळला गेला, ज्यामध्ये मोठा रोमांचक सामना पाहायला मिळाला. परंतु शेवटी भारताने हा सामना जिंकला आणि ऑस्ट्रेलियाचा ६ धावांनी पराभव केला. या विजयाने टीम इंडियाने केवळ मालिका काबीज केली नाही, तर एक नवा हिराही शोधून काढला आहे, ज्याचा पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात नक्कीच संघाला चांगला फायदा होऊ शकतो.
कोण आहे भारताचा नवा मॅचविनर ?
टीम इंडियाचा युवा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईला मालिकावीरचा किताब देण्यात आला. या मालिकेतील ५ सामन्यांमध्ये त्याने एकूण ९ विकेट घेतल्या आणि जवळपास सर्व सामन्यांमध्ये आपल्या गोलंदाजीने प्रभाव पाडला, ज्यामुळे टीम इंडिया विजय मिळवण्यात यशस्वी ठरली. असेच काहीसे पाचव्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात घडले. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेडने पहिल्याच षटकातच चौकार मारले.
टीम इंडियाने दिलेल्या १६१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने ऑस्ट्रेलियाला अतिशय वेगवान सुरुवात करून दिली आणि अवघ्या १७ चेंडूत २८ धावा केल्या, पण रवी बिश्नोईने टाकलेला १८वा चेंडू त्याच्यासाठी घातक ठरला आणि तो क्लीन बोल्ड झाला. बिश्नोईच्या या विकेटने टीम इंडियाला सामन्यात परत आणले आणि विजयाची नवी आशाही दिली. पाचव्या टी-२० सामन्यात बिश्नोईने ४ षटकात २९ धावा देत २ विकेट घेतले.
या मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे रवी बिश्नोईने रविचंद्रन अश्विनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. भारतासाठी एकाच टी-२० मालिकेत सर्वाधिक ९ विकेट घेण्याच्या बाबतीत त्याने अश्विनच्या या कामगिरीची बरोबरी केली आहे. त्याच्यासाठी ही एक आश्चर्यकारक कामगिरी आहे.
प्लेअर ऑफ द सीरीज घोषित झाल्यानंतर बिश्नोई म्हणाला, “मी पहिल्या सामन्यात गोलंदाजी केली नाही. मी फक्त माझ्या रणनितींवर लक्ष केंद्रित केले. माझी रणनिती फक्त स्टंप-टू-स्टंप गोलंदाजी करणे ही होती.”
दक्षिण आफ्रिका मालिकेबाबत तो म्हणाला. ‘तिथे एक वेगळी विकेट असेल, वेगळे आव्हान असेल. मी शक्य तितक्या लवकर त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करेन.’