सोलापूर : सीना नदीकाठी आलेल्या महापुरामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी, वडकबाळ, हत्तूर आदी गावांतील अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर इन्फोसिस फाउंडेशन, इन्फोसिस पुणे सीएसआर आणि ‘स्पर्श – ए हीलिंग टच’ तसेच ‘सेवा सहयोग फाउंडेशन’, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला.
या उपक्रमांतर्गत सुमारे ४०० कुटुंबांना, म्हणजेच अंदाजे १६०० नागरिकांना, मदत पोहोचवण्यात आली. या किटमध्ये अन्नधान्य, दैनंदिन वापराच्या वस्तू तसेच आवश्यक साहित्याचा समावेश होता. ही मदत पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत सुरळीतरीत्या पोहोचवण्यासाठी स्थानिक स्वयंसेवकांनी मनापासून परिश्रम घेतले.
या मदत कार्याचा समन्वय इन्फोसिस फाउंडेशन, इन्फोसिस पुणे सीएसआर – स्पर्श आणि सेवा सहयोग फाउंडेशनच्या टीम्सनी केला. स्थानिक नागरिकांनी या मदत कार्याबद्दल समाधान व्यक्त करत या संस्थांचे मनःपूर्वक आभार मानले.
वंचितांपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न
“ज्या कुटुंबांपर्यंत किट पोहोचू शकले नाही, अशा अपंग, विधवा आणि वयस्कर नागरिकांना प्राधान्य देण्यात आले.
इंटरनल सर्व्हेद्वारे वंचित लाभार्थ्यांची नावे शोधून त्यांच्यापर्यंतही किट पोहोचवण्यात आले,” अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.


















