कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकावत खंडणी मागणार्या एका सराईत गुन्हेगाराच्या खंडणीविरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. इब्राहिम मोहम्मद हानिफ खान ऊर्फ इम्रान कालिया असे त्या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने दक्षिण मुंबईतील एका महिलेची फसवणूक करून मग तिला दाऊदच्या नावाने धमकावत लाखो रुपयांची खंडणी उकळली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान विरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात त्याने फसवणूक, धमकावणे, लाखो रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी महिलेने तक्रार दिली होती. या तक्रारीची तत्काळ दखल घेत पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अरुण थोरात, एपीआय मारुती कदम यांच्या पथकाने सोमवारी रात्री खानला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याने दाऊदचा माणूस असल्याचे सांगत अनेकांना धमकावले होते आणि अशा प्रकारे अनेकांकडून खंडणी उकळली असण्याची दाट शक्यता आहे. तो दाऊद टोळीतील कोणाच्या संपर्कात आहे. तसेच त्याने कोणा कोणाला धमकावून खंडणी वसूल केली, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.