बार्शी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथमतः क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ. अश्विनी मंडलिक, उपसरपंच सुधीर गायकवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सिद्धेश्वर जगताप, उपाध्यक्ष सुधीर माने, नितीन मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकामध्ये सौ. वीणा कदम यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त माहिती सांगितली.
बिनादेवी दरेकर यांनी सबलीकरण आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,कल्पना चावला, किरण बेदी यांच्या संघर्षमय जीवनाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये महिलांच्या रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, लिंबू चमचा, संगीत खुर्ची इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवलेल्या महिलांचा चिकुचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील माजी विद्यार्थिनी डॉ. ज्ञानेश्वरी सुतार हिचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत कासारवाडीकडून उपस्थित सर्व महिलांना चिकूच्या रोपांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, महिला बचत गटाचे सदस्य, महिला ग्रामसंघाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुधाकर बडे, अभयकुमार कसबे, बाळासाहेब मुंढे, श्रीमती मनीषा भोसले, श्रीमती रेणुका मुंढे, श्रीमती द्वारका पिंपळे, ग्रामसेविका सोनवणे, आबासाहेब चौधरी यांनी परिश्रम घेतले.


















