इस्लामाबाद, 24 फेब्रुवारी (हिं.स.) : ईराणच्या सैन्याने आज, शनिवारी पुन्हा एकदा पाकिस्तानी हद्दीत घुसून सर्जिकल एअर स्ट्राइक केली आहे. ईराणने पाकिस्तानची सीमा ओलांडून जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेचा कमांडर ईस्माइल शाह बक्श आणि त्याच्या साथीदारांचा खात्मा केला आहे.
ईराण आणि पाकिस्तान हे दोघेही बलुचिस्तानच्या काही भागावर दावा करतात. गेल्या 70 वर्षांपासून इथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे दोन्ही देशातील काही बलाढ्या टोळ्या सीमेपलीकडून बेकायदा कारवाया करत आहेत. मागच्या काही वर्षांत प्रगत आणि उच्च तंत्रज्ञानामुळं सीमेवर लक्ष ठेवण्याचे काम सोपे झाले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील सीमावादावरून तणाव वाढला आहे. जैश अल-अदल ही दहशतवादी टोळी पाकिस्तानच्या भूमीचा वापर करून आमच्या देशात हल्ले करते, असा ईराणचा आरोप आहे. ईराणने गेल्या 17 जानेवारी रोजी पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम बलुचिस्तानमधील पंजगुरमध्ये हवाई हल्ला केला होता. त्यानंतर पाकिस्तानने त्यास प्रत्युत्तर देत इराणच्या सीमेवरील बलुच बंडखोरांच्या तळांवर हल्ला केला होता.
जैश अल-अदल या संघटनेची स्थापना 2012 मध्ये झाली होती. ईराणने या गटाला ‘दहशतवादी’ घोषित केले आहे. जैश अल अदल ही एक सुन्नी अतिरेकी संघटना आहे. ही संघटना प्रामुख्याने दक्षिण-पूर्व सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात सक्रिय आहे. जैश अल-अदलने गेल्या काही वर्षांत ईराणच्या सुरक्षा दलांवर अनेक हल्ले केले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जैश अल-अदलने सिस्तान-बलुचेस्तानमधील एका पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. त्यात 11 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. ईराण हा शिया पंथीय मुस्लिम देश असल्याने या संघर्षाला शिया-सुन्नी असे स्वरूप आहे. त्यामुळे ईराणने आज, शनिवारी पुन्हा एकदा पाकिस्तानची सीमा ओलांडून जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेचा कमांडर ईस्माइल शाह बक्श आणि त्याच्या साथीदारांचा खात्मा केला आहे.