सोलापूर – प्रत्येक घरातील महिला, आपले घर सांभाळून नोकरी व व्यवसाय निमित्ताने समाजात मिळून मिसळून काम करीत आहे. त्यांच्या मागे पुरुष मंडळी भक्कमपणे उभी आहे. कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्यानेच स्त्री जीवन फुलते हे मान्यच करावे लागेल” असे भावोत्कट उद्गार प्रमुख पाहुणे कल्पना जयकुमार कस्तुरे यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त जैनस्कोच्या वतीने आयोजित ज्येष्ठ व कर्तृत्ववान महिलांच्या सत्कार सोहळ्यात संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष लुणावत व कार्याध्यक्ष केतन शहा यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित या कार्यक्रमात, अजित कुमार शहा-भूमकर, अरुणकुमार धुमाळ, सुनील गांधी (हरिभाई देवकरण) अभिनंदन विभूते, यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
ज्योती कोठारी यांनी सत्कार मूर्तींचा परिचय करुन दिल्यानंतर, कल्पना कस्तुरे, संतोष बंब, सरिता राका, संगीता सेठिया, कल्पना भन्साळी, कामिनी गांधी, माया पाटील व पंकजा पंडित यांचा प्रातिनिधिक स्वरुपात शाल, मौक्तिक माळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदकुमार कंगळे, अजित शहा-भूमकर, महावीर सांस्कृतिक भवनचे सर्व विश्वस्त, कर्मचारी, जैनस्को परिवाराने परिश्रम घेतले. कार्यक्रमास सकल जैन समाजातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























