अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाईला सामोरे जात असतानाच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अचनाक बेपत्ता झाले आहेत. ईडीचे पथक त्यांची प्रतीक्षा करीत असतानाच भाजप नेते बाबूलाल मरांडी यांनी सोशल मिडीयात पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांचा शोध घेण्याचे आवाहन करत टोला लगावला आहे.
जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अडचणीत सापडले आहेत. ईडीने सोमवारी 29 जानेवारी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर छापा टाकला होता. यावेळी ईडीच्या पथकाने काही कागदपत्रे, 36 लाख रुपये आणि हेमंत सोरेन यांची बीएमडब्ल्यू कार जप्त केली होती. हेमंत सोरेन हे शनिवारी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले होते. चार्टर्ड विमानाने ते पहाटे दिल्लीला पोहोचले. तेव्हापासून त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. तपास यंत्रणा चौकशीसाठी त्यांचा शोध घेत आहे. मात्र त्यांचे ठिकाण कळू शकलेले नाही. त्यामुळे सोरेन यांच्या निवासस्थानाबाहेर कलम 144 (संचारबंदी) लागू करण्यात आलीय.
यापार्श्वभूमीवर भाजप नेते बाबुलाल मरांडी यांनी सोशल मिडीवरील पोस्टमध्ये सोरेन यांना शोधण्याचे आवाहन केलेय. मरांडी म्हणाले की, मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे केंद्रीय एजन्सीच्या भीतीने बेपत्ता झाल्याचे लिहिले आहे. तसेच, गेल्या 40 तासांपासून त्यांचा पत्ता नाही. मुख्यमंत्री आपले सार्वजनिक कर्तव्य सोडून बेपत्ता आहेत आणि तोंड लपवून पळत आहेत, असे म्हटले आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे अशा प्रकारे बेपत्ता होणे, केवळ त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेलाच धोका नाही तर संपूर्ण झारखंडच्या लोकांच्या सुरक्षेला आणि सन्मानालाही धोका आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांचा शोध घेणाऱ्याला 11 हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही मरांडी यांनी केली आहे. जो कोणीही विलंब न लावता झारखंडच्या आश्वासक मुख्यमंत्र्यांचा शोध घेईल, त्यांना शोधून सुखरूप परत आणेल, त्याला 11 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे बाबूलाल मरांडी यांनी म्हटले आहे.