बार्शी – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, कर्मवीर विद्यालय, चारे येथे समाजसेवक कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त “सर्व श्रेष्ठ दान – रक्तदान” या सामाजिक उपक्रमांतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबीर दि. १ फेब्रुवारी रोजी यशस्वीरीत्या पार पडले.
या शिबिराला चारे, वालवड, पाथरी, बोरगाव, बांगरवाडी, म्हसोबावाडी, परिसरातील नागरिक, माजी विद्यार्थी, पालक, महिला, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, युवक-युवती तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रतिसाद लाभला.
डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून तब्बल १२३ रक्तदात्यांनी रक्तदान करुन जयंतीला मानवंदना दिली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भगवंत ब्लड बँक, बार्शी व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. रक्तदान प्रक्रियेदरम्यान सर्व आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या असून, रक्तदात्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेण्यात आली.प्रत्येक रक्तदात्यांना प्रमाणपत्र, अल्पोपहार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचतात. रक्तदान ही मानवतेची खरी सेवा असून समाजातील प्रत्येक सक्षम व्यक्तीने या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य, श्री चव्हाण सर व आयोजक समिती यांनी या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, सेवाभाव आणि राष्ट्रप्रेम वृद्धिंगत होत असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


























