हाणेगाव – देगलूर तालुक्यातील हाणेगाव परिसरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांनी डोके वर काढले होते. यामुळे व्यापारी वर्गासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वारंवार घडणाऱ्या चोऱ्यांमुळे “चोर सापडणार तरी कधी?” असा प्रश्न उपस्थित होत असतानाच मरखेल पोलिस ठाण्याने या गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात कंबर कसून . शेवटी चोरट्यांना पकडले. या कारवाईमुळे बालाजी पाटील इंगळे यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
मरखेल पोलिस ठाण्यामार्फत सातत्याने शोध मोहीम राबविण्यात येत होती. मात्र अपेक्षित यश मिळत नसल्याची खंत पोलिस कर्मचाऱ्यांना सतावत होती. अखेर ३० जानेवारीच्या मध्यरात्री गस्ती दरम्यान मरखेल पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास धोंडिराम पवार, पोलिस कॉन्स्टेबल सय्यद व पोलिस कॉन्स्टेबल चालक सोनकांबळे यांच्या सतर्कतेने आणि दबंग कारवाईने चोरट्यांना रंगेहात पकडण्यात यश मिळाले.
या धाडसी आणि कार्यतत्पर कारवाईमुळे हाणेगाव परिसरातील व्यापारी व नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून, मरखेल पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे देगलूर तालुकाध्यक्ष बालाजी पाटील इंगळे यांच्या वतीने पोलिस उपनिरीक्षक विलास पवार व त्यांच्या संपूर्ण टीमचा सत्कार करण्यात आला. कार्यतत्परता, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श घालून देणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान होणे म्हणजे समाजात पोलिस दलाविषयी विश्वास अधिक दृढ होण्यासारखेच आहे. मरखेल पोलिसांच्या या कामगिरीमुळे गुन्हेगारांना स्पष्ट इशारा मिळाला असून, कायदा-सुव्यवस्थेवर जनतेचा विश्वास अधिक बळकट झाला आहे.





















