सोलापूर – राज्य मराठी विकास संस्था व सुभद्रा माऊली प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चिंतामणी विद्यामंदिर, थेऊर येथे ” किशोर मराठी साहित्य मेळावा ” कार्यक्रम उत्साहात पार पडला . यावेळी प्रमुख
पाहुणे व अतिथी श्री संतोष चौंडावार , यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री मोरेश्वर काळे , चिंतामणी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री राजाराम काकडे , सुभद्रा माऊली प्रतिष्ठान पुणे चे अध्यक्ष श्री प्रविण
मोरे ,खजिनदार श्री प्रशांत मोरे, चिंतामणी विद्यामंदिरचे शालेय शिक्षण समितीचे समन्वयक श्री जीवन शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले. राज्यगीताने कार्यक्रमाला
सुरुवात झाली .कार्यक्रम प्रास्ताविकेत श्री प्रशांत मोरे यांनी मराठी भाषेचे जतन आणि संवर्धनाचे महत्व पटवून दिले .
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री संतोष चौंडावार आपल्या मनोगतात म्हणाले, ” आजच्या काळात मराठी भाषा जपण्याची सुरुवात शालेय विद्यार्थ्यांपासून सुरु व्हायला हवी. शालेय जीवनात
विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्र तसेच छोटी छोटी मराठी पुस्तके वाचायला हवीत. त्याने आपल्या माय मराठी चे संवर्धन होण्यास हातभार लागेल ! ” सुभद्रा माऊली प्रतिष्ठान पुणे चे अध्यक्ष श्री प्रविण मोरे यांनी ” मातीशी
असणारी घट्ट नाळ फक्त आणि फक्त मराठी भाषेमुळे टिकून राहते . कारण मराठी भाषेला खूप मोठी समृद्ध परंपरा आणि वारसा लाभलेला आहे .ज्ञानेश्वर माऊलीपासून छत्रपती शिवरायांपर्यंत चालत आलेली मराठी
भाषा आपल्या दैनंदिन जीवनात मुख्य भाषा म्हणून प्रत्येकाने वापरायला हवी . ” असे मत व्यक्त केले .
या कार्यक्रमामध्ये मराठी सुविचार स्पर्धा, मराठी कवितावाचन स्पर्धा, मराठी कथावाचन स्पर्धा , मराठी निबंध स्पर्धा , मराठी वक्तृत्व स्पर्धा , मराठी घोषवाक्य स्पर्धा , मराठी हस्ताक्षर स्पर्धा अशा
विविध स्पर्धेतील विजेत्यांना मेडल ,प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले .कार्यक्रमात शेवटी श्री जीवन शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले आणि पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
























