वेळापूर – वेळापूर नगरी ही खो खो खेळाडूंची पंढरी असून या नगरीमध्ये आज पर्यंत राष्ट्रीय अनेक मोठे खेळाडू निर्माण झाले आहेत, अनेक खेळाडूंनी भरत किताब मिळवला आहे अशा नगरी मधील उभरत्या खो खो खेळाडूंना त्यांच्या प्रगतीसाठी जे जे होईल ते सहकार्य माझ्याकडून केले जाईल असे प्रतिपादन माळशिरस आमदार उत्तमराव जानकर यांनी व्यक्त केले. ते वेळापूर पालखी मैदान येथे राष्ट्रीय खो-खो खेळाडू व वेळापूर नगरीचा सुपुत्र रामजी कश्यप याला मानाचा एकलव्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत सिल्वर मेडल मिळवल्याबद्दल श्रीकृष्ण मेटकरी व राष्ट्रीय प्रशिक्षक अक्षय राऊत आदींचा सत्कार समारंभाचे आयोजन अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार उत्तमराव जानकर हे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर वेळापूर सरपंच रजनीश बनसोडे, प्रतापराव पाटील, प्राचार्य आर बी पवार ,मार्केट कमिटीचे माजी संचालक दादासाहेब घाडगे, राष्ट्रीय प्रशिक्षक अक्षय राऊत, राष्ट्रीय प्रशिक्षक सोमनाथ बनसोडे, अर्धनारी नटेश्वर मंडळाचे अध्यक्ष जावेद मुलाणी, सतीश कदम,शिवाजी जाधव उपस्थित होते.
यावेळी अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळाच्या वतीने आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते रामजी कश्यप श्रीकृष्ण मेटकरी व त्यांचे मातापिता तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक अक्षय राऊत यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच शिवाजी जाधव यांच्यासह आमदार उत्तमराव जानकर यांचा सन्मान करण्यात आला .
यावेळी बोलताना आमदार उत्तमराव जानकर म्हणाले की रामजी कश्यप याने खो खो खेळामध्ये देशामध्ये आपल्या वेळापूर गावाचे व इंग्लिश स्कूल वेळापूर शाळेचे नाव उज्वल केले आहे या खेळाडूस वेळापूर शहरात माझ्याकडून दोन लाख रुपये पर्यंतचे घर बांधून दिले जाईल असे यावेळी आश्वासन देऊन ते पुढे म्हणाले की खो खो खेळाडूंनी आपले शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित एक तास व्यायाम केला पाहिजे व जिद्दीने व कष्टाने परिश्रम घेतल्यास निश्चितच खेळाडूंना खो खो मध्ये मोठे यश मिळेल त्याचबरोबर खेळाडूंना मैदानावर पाण्याची कमतरता जाणवत असून यासाठी बोअर पाडून पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटवला जाईल असे यावेळी उत्तमराव जानकर यांनी सांगितले.
या गौरव सोहळ्यास उपसरपंच नानासाहेब मुंगूसकर, राजू शिंदे, भैय्या कोडग,दादा तूपे, अमोल पनासे, रायचंद खाडे, भैया चंदनशिव, दिपक खाडे, अशोक जाधव, धनंजय शिवपुजे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, अर्धनारी नटेश्वर खो-खो क्रिडामंडळाचे सर्व सदस्य, इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज वेळापूरचे शिक्षकवृंद, तसेच खो-खो खेळाडू व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा प्रमुख सतीश कदम यांनी केले.

























