पंढरपूर – माघी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागातून रेल्वे, एसटी आणि खासगी वाहनांमधून लाखोंच्या संख्येने भाविक येथे दाखल झालेले आहेत. विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांना सुमारे दहा ते बारा तासांचा कालावधी लागत आहे. माघी यात्रे निमित्त विठ्ठलरुक्मिणी मंदिरावर आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे.
राज्याच्या विविध भागातून संतांच्या लहानमोठ्या दिंड्याचे पंढरीनगरीत आगमन होवू लागलेले आहे.विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग बुधवारी (ता.२८) सकाळी गोपाळपूर रस्त्यावरील सर्व शेवटच्या पत्राशेड मध्ये गेली होती. मुखदर्शनासाठी देखील भाविकांची रांग लागलेली दिसत आहे.
माघी यात्रेतील मुख्य एकादशीचा सोहळा गुरुवारी (ता.२९) रोजी संपन्न होत आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांमुळे सध्या पंढरीनगरीतील विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, स्टेशन रस्ता आणि पासष्ठ एकर परिसर फुलून गेलेला दिसत आहे.
———————-
शहरातील मठ, धर्मशाळांमधुन वारकऱ्यांची लगबग
येथील गजानन महाराज मठ, संत तनपुरे महाराज मठ, कैकाडी महाराज मठातून तसेच मंदिर समितीचे सुमारे तीनशे खोल्यांचे भव्य भक्तनिवास, या बरोबरच मंदिर समितीच्या वेदांत, व्हिडीओकाँन तसेच रेल्वेस्टेशन जवळील भक्तनिवास ( पर्यटक निवास ) या मधुन देखील भाविकांची वर्दळ वाढल्याचे दिसत आहे.
———————-
छोट्या मोठ्या व्यावसायिकांची दुकाने सज्ज
यात्रेसाठी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर तसेच प्रदक्षिणा मागार्वर छोट्या मोठ्या व्यावसायीकांनी आपली दुकाने थाटलेली दिसत आहेत. गेले एक दोन दिवस रात्रभऱ् मेहनत घेवून आपल्या दुकानांमधून आकर्षक पध्दतीने त्यांनी मालाची मांडणी केलेली दिसत आहे. या मध्ये प्रासादिक वस्तु, फोटोफ्रेम, देवतांच्या ताब्या पितळेच्या मुर्ती, तुळशीच्या माळा, विविध धामिर्क ग्रंथ, सी.डी कँसेट आदी दुकानांचा समावेश आहे. ही सर्व दुकाने विक्रीसाठी सज्ज झालेली आहेत.
———————-
पासष्ठ एकरात राहुट्यांची गर्दी
चंद्रभागा नदीच्या पैलतिरावर वसविलेल्या पासष्ठ एकर परिसरात काही दिंड्या सध्या मुक्कामासाठी दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे या परिसरात राहूट्या उभारण्याच्या कामात वारकरी व्यस्त दिसत आहे.
———————-
चंद्रभागेच्या वाळवंटात धार्मिक कार्यक्रम
चंद्रभागेच्या पात्रात येथील बंधाऱ्यामधुन पाणी सोडल्यामुळे पुरेसा पाणी साठा नदीपात्रात उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे भाविकांना चंद्रभागा स्नानाची पर्वणी आनंदाने लुटता येत आहे. वाळवंटा मध्ये भाविकांचे स्नाना नंतरचे पुजा, हरिपाठ वाचनाचे दैनंदिन नित्य कार्यक्रम सुरु आहेत. या बरोबरच वाळंटात महाराज मंडळींच्या विविध फडावर सुरु असलेल्या भजन, कीर्तन तसेच प्रवचनाच्या कार्यक्रमा मध्ये वारकरी भाविक सहभागी होताना दिसत आहेत.
———————-
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
शहरात विठ्ठल मंदिर, वाळवंट, पत्राशेड, पदस्पर्श दर्शन रांग, मुखदर्शन रांग, पासष्ठ एकर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आदी गर्दीच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.


















