राज्यातील लातूर इथल्या विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान आणि संशोधन केंद्राच्या विवेकानंद कर्करोग आणि सुपर स्पेशालिटी विस्तारित रुग्णालयाचे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते आज, मंगळवारी उद्घाटन झाले. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत प्रमुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी माडविया म्हणाले की, पारंपरिक आरोग्य सेवा पद्धतीमधील प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक दृष्टिकोनाने सध्याच्या आधुनिक युगात उल्लेखनीय भूमिका बजावली आहे. अगदी अलीकडच्या कोरोना साथरोगाच्या काळात देखील हा दृष्टिकोन महत्वपूर्ण असल्याचे सिद्ध झाले आहे. जगाकडे अनेक आरोग्य प्रारूपे प्रचलित आहेत, मात्र भारताने भारतीय जनुकशास्त्रावर आधारित स्वतःचे आरोग्य प्रारूप सक्षम करून भौगोलिक दृष्ट्या आढळणाऱ्या रोगांच्या खंडीय नमुन्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे ते यावेळी बोलताना म्हणाले. आपण आपले मूलाधार न विसरता पूर्वापार चालत आलेल्या जीवनशैलीला आपलेसे करण्याच्या पारंपारिक पद्धतींवर चिंतन केले पाहिजे, त्या काळात अन्न हे सर्वसामान्य प्रमाण होते आणि त्यातच आपल्याला आज प्रचलित असलेल्या आरोग्याच्या अनेक समस्यांवर उपाय सापडतील.” यावर त्यांनी भर दिला. गेल्या पाच वर्षात कर्करोग आणि मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेल्या वाढीचा उल्लेख करून ते म्हणाले की पारंपरिक राहणीमान आणि अन्नसेवनाच्या सवयींमुळे अनेक औषधी गुणधर्मांची प्राप्ती होते आणि आरोग्य सेवेच्या परिदृश्यातील कित्येक हानिकारक बदल कमी करण्यात त्यांची महत्वाची भूमिका असते. भारताच्या आरोग्य प्रारूपाचा पाया असलेला भारताचा वारसा आणि मूलाधार यांमध्ये अनेक आजारांवरील उपचारांचे रहस्य दडलेले आहे, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखालील, केंद्र सरकार आरोग्य सेवांमध्ये समानता आणण्याचा प्रयत्न करत आहे, अनेक आरोग्य सेवा उपक्रमांद्वारे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सर्वाना परवडण्याजोगे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे डॉ मांडवीया म्हणाले. भारतीय आरोग्यसेवा क्षेत्रातील तज्ञ व्यावसायिक व्यक्तींच्या मानवतेला सेवा देण्याच्या वचनबद्धतेचे त्यांनी कौतुक केले. भारतीयांमधील या परंपरेचे मूळ आपल्या युगानुयुगे प्राचीन संस्कृतीत असून जगाला आता त्याची ओळख पटत आहे. कोविड महामारीमुळे जगाला भारतीयांच्या वैद्यकीय आणि औषधनिर्माण क्षेत्रातील सामर्थ्याचेच नव्हे तर वसुधैव कुटुंबकम या मूल्याची जाणीव झाली, असे ते म्हणाले. भारतात आरोग्याला सेवेचा दर्जा दिला जातो याचा पुनरुच्चार त्यांनी केला. देशात एक लोक केंद्रित, मूल्यांवर आधारित आरोग्य सेवाक्षेत्र विकसित व्हावे अशी महत्वाकांक्षा आहे. आपल्या संस्कृतीने आपल्याला माणसांची सेवा करायची शिकवण दिली. आरोग्य म्हणजे काही व्यापार नव्हे तर आपल्या अंतर्भूत असलेली सेवा आहे, असे ते म्हणाले.
आरोग्य सेवा क्षेत्रात भारताने जगाला दिलेले योगदान आणि एकूण पुढाकार याचा त्यांनी उल्लेख केला. “परदेशातील 10 पैकी 3 वैद्यकीय संशोधन व्यावसायिक भारतीय आहेत. भारतातील वैद्यकीय आणि आरोग्य सेवांचा विस्तार आपल्या सीमेपलीकडे झाला असून त्यात संपूर्ण जगाला सामावून घेतले जात असल्याचे डॉ. मांडविया यांनी सांगितले.आरोग्य क्षेत्रात सर्वसमावेशकपणे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा यांच्यात समन्वय साधून कार्य करणे आणि जनचळवळीच्या माध्यमातून संपूर्ण देशात आरोग्य सेवा पोहोचेल याची खात्री करणे हे आमचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.