ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ फली एस. नरिमन यांचे आज, बुधवारी वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 95 वर्षांचे होते. नरिमन पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
आयुष्यात तब्बल 70 वर्षे कायद्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या फली नरिमन यांनी 1950 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात वकिलीला सुरुवात केली. त्यानंतर 1972 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरू केली. त्यानंतर मे 1972 मध्ये त्यांच्याकडे भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून जबाबदारी देण्यात आली. फली नरिमन यांनी 1991 ते 2010 या काळात बार असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्षपदही भूषवले होते. त्यांना जानेवारी 1991 मध्ये पद्मभूषण आणि 2007 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.
एनजेएसीचा निकाल आणि एससी एओआर असोसिएशन प्रकरण यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणांचा युक्तिवाद त्यांनी केला, ज्यामुळे कॉलेजियम प्रणालीच्या स्थापनेवर परिणाम झाला. टीएमए पै प्रकरणासारख्या प्रकरणांमध्येही त्यांनी भाग घेतला, कलम 30 अंतर्गत अल्पसंख्याकांच्या अधिकारांच्या मर्यादेकडे लक्ष वेधले. तत्कालनि इंदिरा गांधी सरकारने जून 1975 मध्ये आणीबाणी जाहीर केल्याच्या विरोधात नरिमन यांनी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पदाचा राजीनामा दिला होता. दिवंगत फली नरिमन 1994 पासून इंटरनॅशनल कौन्सिल फॉर कमर्शियल आर्बिट्रेशनचे अध्यक्ष, 1989 पासून इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सच्या इंटरनल कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनचे उपाध्यक्ष तसेच 1995 ते 1997 या काळात जिनिव्हा येथील इंटरनॅशनल कमिशन ऑफ ज्युरिस्ट्सच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.


















