सोलापूर : येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर गेल्या 2 दिवसापासून चालू असलेला महाराष्ट्र विरुद्ध त्रिपुरा सामना महाराष्ट्राने तिसऱ्याच दिवशी एक डाव व 122 धावांनी जिंकला.
तिसऱ्या दिवशी सकाळी कालची नाबाद जोडी दिग्विजय आणि किरण चोरमले यांनी डाव पुढे सुरू केला, दोघांनी 5 व्या विकेट साठी 90 धावांची भागीदारी रचली आणि दिग्विजय पाटील वैयक्तिक 135 धावांवर (185 चेंडू, 10 चौकार, 3 षटकार) अर्काजीत रॉय चे चेंडूवर यष्टीचीत झाला. त्यानंतर लगेचच किरण ने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि 3 धावांच्या अंतराने तो पण 50 धावांवर (91 चेंडू 2-2 चौकार षटकार) अर्काजीत कडूनच त्रिफळा बाद झाला. नंतर आलेल्या यष्टिरक्षक अभि पवार आणि अजय बोरुडे यांनी संघाची धावसंख्या 500 पार नेली. 134 व्या षटकात 513 धावा वर घोषित केला. त्रिपुरा संघाकडून अमित अली 126/3 बळी व अर्काजीत रॉय याने 102/3 बळी घेतले.
महाराष्ट्राने डाव घोषित केल्यावर त्रिपुरा संघाचा दुसरा डाव सुरू झाला आणि 1 निर्धाव षटक झाल्यावर लंच साठी खेळ थांबला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात मात्र महाराष्ट्राचा सलामीचा तेज गोलंदाज वैभव दारकुंडे यांनी जादुई स्पेल टाकत एका पाठोपाठ एक असे दीपजोय देब (4), सप्तजीत दास (0), दुर्लभ रॉय (17), आनंध भौमिक (0) यांना बाद केले, तर त्याचे सोबतीला शुभम मेड ने अरिंदम बर्मन याला देखील शून्यावर बाद करत निम्मा संघ 52 धावत माघारी धाडला. त्या नंतर मात्र सलामीचा फलंदाज तन्मोय दास याने वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले आणि अमित अली सोबत 53 धावांची भागीदारी केली पण स्वराज चव्हाण ने अमित अली याला 22 धावा केल्या असताना पायचीत केले. चहापानाला खेळ थांबला तेव्हा त्रिपुरा संघाने 6 बाद 105 धावा केल्या होत्या.

शेवटच्या सत्रात उर्वरित 4 खेळाडू लवकरात लवकर बाद करून सामना जिंकायचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन कर्णधाराने किरण चोरमले आणि दिग्विजय पाटील यांना देखील गोलंदाजी साठी पाचारण केले आणि दोघांनी तो विश्वास सार्थ ठरवत एकेक बळी मिळवला. दिग्विजय ने कप्तान संदिप सरकार याला 5 धावांवर पायचीत केले. अमित अली बाद झाल्यावर तन्मोय 84 धावावर (122 चेंडू, 8 चौकार 3 षटकार) किरण चे गोलंदाजी वर स्वयंचित झाला. त्यानंतर आलेल्या अर्काजीत रॉय याने तळातील फलंदाजासोबत थोडाफार प्रतिकार करत चौकार लगावले पण पहिल्या डावात 4 बळी घेणारा शुभम मेड याने राजदीप दत्ता (0), दीपेन बिस्वास (8) यांना अनुक्रमे अनिरुद्ध साबळे आणि सचिन धस करवी झेल बाद करत शेवटचे 2 बळी मिळवले आणि विजयावर शिक्कामोर्तब केला.
वैभव दारकुंडे 54/4, शुभम मेड 53/3 तर स्वराज चव्हाण, दिग्विजय पाटील, किरण चोरमले यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवत महाराष्ट्राच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
या विजयासह महाराष्ट्राने सामन्यात 16 गुणांची कमाई केली असून गटात पहिल्या 2 स्थानात जागा मिळवली आहे. तिसऱ्याच दिवशी सामना संपल्याने चौथ्या दिवशी महाराष्ट्राचे खेळाडूंना विश्रांती मिळणार असून 30 जानेवारी पासून सोलापुरात पाँडिचेरी संघासोबत पुढचा सामना होणार असल्याचे जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने कळविण्यात आले.
























