माझी लाडकी बहीण योजनेसह पात्र शेतकऱ्यांना मिळणार सिंचन विहीरींचा लाभ – आमदार संतोष दानवे
भोकरदन : राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने राज्यातील महायुती सरकारने महिलांकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात केली असुन या योजनेच्या माध्यमातुन राज्यातील पात्र महिलांना 1 जुलै 2024 पासुन दरमहा 1500 रुपयांचे अनुदान सुरु करण्यात येणार आहे.
सदर योजने प्रमाणेच भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहीरी व जनावरांच्या गोठयांचा लाभ तात्काळ देण्यात यावा आशा सुचना आमदार संतोष पाटील दानवे यांनी दोन्ही तालुक्यातील पंचायत समितीच्या संबधित कर्मचाऱ्यांना शनिवार दि. 06 जुलै 2024 रोजी भोकरदन येथे दिल्या. त्यामुळे भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यातील किमान 1 एकर ते 5 एकर च्या आत जमीन धारणा असलेल्या पात्र शेतकऱ्यांना सिंचन विहीरींचा लाभ होवुन त्यांच्या शेतीच्या उत्पन्नात मोठया प्रमाणावर वाढ होणार आहे.
या सिंचन विहीरी व जनावरांचे गोठे शेतकऱ्यांना देत असतांना शासनाने ठरवुन दिलेल्या निकषांचे काटेकोरपणे पालन करुन पारदर्शक पध्दतीने ही योजना दोन्ही तालुक्यामध्ये प्रभावीपणे राबवावी व त्यामध्ये कुठल्याही स्तरावर शेतकऱ्यांची अडवणुक अथवा फसवणुक होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सुचना ही आमदार संतोष पाटील दानवे यांनी या बैठकीमध्ये प्रशासनाला दिल्या. सदर योजना ही अत्यंत पारदर्शकपणे व कुठल्याही पात्र शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही
याची पुरेपुर काळजी घेवुन राबविण्यात येणार असल्यामुळे योजनेस पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्या ही मध्यस्थ किंवा दलालांशी अर्थिक व्यवहार करू नये व योजनेचा लाभ देण्यासाठी कुठलाही अधिकारी, पदाधिकारी वा शासकिय कर्मचाऱ्यांनी पैशांची मागणी केल्यास पिडीत शेतकऱ्यांनी माझ्या भोकरदन व जाफ्राबाद येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये संपर्क साधुन तक्रार नोंदवावी, त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल अशा सुचनाही आमदार संतोष पाटील दानवे यांनी यावेळी दिल्या