पंढरपूर – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.२१) पंढरपूर तालुक्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे, त्यांचे बंधु समाधान काळे, गणेश पाटील अखेर भाजपमध्ये सहभागी झाले. समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे यांना भाजपने वाखरी त गणेश पाटील यांच्या मातोश्री प्रफ्फुलता पाटील यांना भोसे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिली तर करकंब येथील भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे.
दरम्यान आमदार अभिजीत पाटील यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व जागांवर तर भागीरथ भालके यांनीही तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मनसेने टाकळी आणि रोपळे पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर भाळवणी पंचायत समिती गणातून उध्दव ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आमदार अभिजीत पाटील व त्यांच्या समर्थकांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसीलकार्य अशी पायी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. रॅलीमध्ये पाटील समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर उमेदवार निवडीचे सर्व सुत्रे आमदार अभिजीत पाटील यांच्याकडे आल्यामुळे ऐनवेळी कल्याणराव काळे यांची कोंडी झाली. श्री. काळे यांनी राजकीय कोंडी फोडण्यासाठी शेवट पर्यंत पर्यंत केले,पण आमदार अभिजीत पाटील यांनी काळे समर्थकांना उमेदवारी देण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे शेवटी कल्याणराव काळे, गणेश पाटील, समाधान काळे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये सहभागी होण्याचा गुरुवारी दुपारी निर्णय घेतला. त्यानंतर काळे गटाच्या उमेदवारांना भाजपाचे एबी फाॅर्म दिले. यामध्ये कल्याणराव काळे गटाला भाजपने वाखरी, भाळवणी या दोन जिल्हा परिषद गटासह चार पंचायत समिती गण दिल्याची माहिती आहे. भाळवणी गटातून काळे समर्थक जयश्री पोपट लोखंडे यांनी भाजपने उमेदवारी दिली आहे.
यंदाची निवडणुक राष्ट्रवादी काॅंग्रेस व भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. भाजप नेते माजी आमदार प्रशांत परिचारक व उमेश परिचारक यांनी प्रत्येक गटात मातब्बर उमेदवार दिले आहेत. तर आमदार पाटील यांनी ताकद पणाला लावली आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या गोपाळपूर जिल्हा परिषद गटातून भाजपने माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाळ अंकुशराव यांच्या पत्नी दुर्गा गोपाळ अंकुशराव यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने हणमंत पवार यांच्या पत्नी सुनिता पवार यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व्यंकट भालके यांनी स्वतः कासेगाव मधून तर त्यांच्या पत्नी भालके यांनी गोपाळपूर मधून तीर्थक्षेत्रविकास आघाडी म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. करकंब जिल्हा परिषद गटामध्ये परिचारक यांना मोठा धक्का बसला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख यांना उमेदवारी नाकारून भाजपने आदिनाथ देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या बाळासाहेब देशमुख यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले आहे. येथे देशमुख बंधू मध्ये काटे की टक्कर अशी लढत होणार आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे व्यापार उद्योग विभागाचे प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे यांनी टाकळी पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने संदीप मांडवे यांना उमेदवारी दिली आहे.























