मंगळवेढा – शहर व ग्रामीण भागात घरोघरी पारंपारिक मकरसंक्रांतीचा सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान हा सण प्रामुख्याने महिलांचा असल्याने महिलानी मकर संक्रांतीच्या पार्श्वभुमीवर बाजारातून पुजा करण्यासाठी 5 खण (सुगड) आणले व त्याची मकरसंक्रांतीदिवशी पुजाअर्चा करून कुटुंबातील महिला श्री संत दामाजीपंत, तिर्थक्षेत्र माचणूर येथील सिद्धेश्वर मंदिर व विठ्ठलाच्या मंदिरात ओवसण्यासाठी गेल्याचे चित्र होते.
मकरसंक्रांतीचा सण हा देशभर मोठया उत्साहात दि.14 जानेवारी रोजी प्रतिवर्षी साजरा केला जातो. सुर्य या दिवशी एका राशीतून दुसर्या राशीत जातो यालाच संक्रमण असेही म्हटले जाते. तसेच संक्रासूर व किंक्रासूर अशा दोन राक्षसांना देवीने अनुक्रमे संक्रातीच्या दिवशी व पुढील दिवशी ठार मारले म्हणून या दिवसाना ही नावे पडली आहेत. हा सण प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या 14 तारखेलाच असतो. या दिवशी सुर्याला व देवाला तीळ व गुळाचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा असल्याने सुवासिनी महिला या दिवशी सुगडाचा वसा सवाष्णीला हळदी कुंकू लावून देतात. या सुगडामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा डाळ, तुरीची डाळ, गव्हाच्या लोंब्या, गाजर, पावटयाच्या शेंगा, उसाचे करव्हे, हरभरा घाटे, तिळ गुळ या सुगडामध्ये घालण्याची प्रथा आहे. मकरसंक्रातीचा सण हा प्रामुख्याने महिला वर्गाचा असल्याने महिलानी पहाटे उठून घराचे अंगण व घर स्वच्छ करून अंगणात विविध रंगाची रांगोळी काढून त्यामध्ये तिळगुळ घ्या गोड बोला… असे रांगोळी काढल्याचे घरोघरी चित्र होते. मकर संक्रांतीच्या दिवशी दुपारी 3 नंतर ओवसण्याची शुभ वेळ पंचांगात नमूद असल्याने महिला दुपारी 3 नंतर श्री दामाजीपंत, तिर्थक्षेत्र माचणूर सिद्धेश्वर मंदिर, विठ्ठल मंदिर आदि ठिकाणी महिलानी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी महिलानी सवाष्णी महिलाना हळदी कुंकू लावून संक्रातीचे वाण लुटले.
ओवसण्यासाठी जाताना महिलांनी अंगावर इरकल साडी,गळयामध्ये विविध सोनेचे दागिने, नाकात नथ असा पेहराव केला होता. नुकत्याच विवाह झालेल्या नववधू या सणासाठी माहेरी कुटुंबियाने आणल्याचे चित्र होते. सध्या व्हाटसअॅप, फेसबुक, इन्स्ट्राग्रामचा जमाना असल्यामुळे दिवसभर अक्षरशः मित्र-मैत्रिण, आप्त-नातेवाईक आदिनी तिळगुळ घ्या… गोड बोला… असे म्हणत शुभेच्छाचा वर्षाव केला. कुटुंबप्रमुखांनी कुटुंबातील लहान मुलांना तिळगुळ देवून त्यांना शुभआशीर्वाद दिले.
















