गेल्या काही दिवसांपासून भारत आणि मालदिव्स यांचे संबंध ताणले गेले आहेत. भारतानं सैन्य माघारी घ्यावं अशी भूमिका मालदिव्सनं घेतली आहे. त्यासाठी आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होत आहे.
मालदिव्समध्ये भारतीय लष्कराच्या उपस्थितीवरुन दोन देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. या प्रकरणात आता महत्त्वाची घडामोड सुरू आहे. मालदिव्समध्ये तैनात असलेल्या भारतीय सैन्याबद्दल दोन देशांमध्ये चर्चा होणार आहे. त्यासाठी मालदिव्सहून एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ दिल्लीला पोहोचलं आहे. त्यात राजदूत आणि सैन्य दलांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. आज या विषयावर चर्चा अपेक्षित आहे.
मालदिव्सचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी निवडणूक प्रचारात ‘इंडिया आऊट’चा नारा दिला होता. सत्तेत आल्यास भारतीय सैन्याला माघारी धाडू असं वचन त्यांनी दिलं होतं. ते चीनधार्जिणे म्हणून ओळखले जातात. सत्तेत आल्यानंतर त्यांनी भारताकडे सैन्य माघारी घेण्याची मागणी केली. त्यानंतर कोअर ग्रुपची स्थापना करण्यात आली. या ग्रुपची पहिली बैठक १४ जानेवारीला मालेमध्ये झाली.
पहिल्या बैठकीनंतर भारताकडून निवेदन जारी करण्यात आलं. ‘बैठकीत व्यवहार्य उपाय काढण्याबद्दल चर्चा झाली. मालदिव्समध्ये तैनात असलेले भारतीय सैनिक तिथे मानवी दृष्टिकोनातून उपस्थित आहेत. वैद्यकीय आपत्कालीन सेवा देण्याच्या हेतूनं ते काम करतात,’ अशी भूमिका भारताकडून मांडण्यात आली.
या बैठकीनंतर मालदिव्सचा पवित्रा वेगळा होता. भारतीय सैनिकांनी लवकरात लवकर मायदेशी परतण्याची गरज असल्याची भूमिका मालदिव्सनं घेतली. सत्तेत आल्यापासून मोहम्मद मोइज्जू सातत्यानं भारतीय सैनिकांच्या घरवापसीचा मुद्दा उपस्थित करत आहेत. त्यांच्या निवडणुकीचा प्रचाराचा मूळ मुद्दाच ‘इंडिया आऊट’ होता. भारतीय सैन्य मोठ्या संख्येनं मालदिव्समध्ये उपस्थित आहेत, असा प्रचार मोइज्जू यांनी केला. त्यात त्यांना यशही आलं. मालदिव्समध्ये भारतीय सैन्याचे केवळ ७७ जवान आहेत. त्यांनी आतापर्यंत शेकडो नागरिकांची मदत केली आहे.