पंढरपूर – विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा बुधवारी (दि.१५) विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. तांत्रिक शिक्षणाबरोबरच मानवी मूल्ये, सर्जनशीलता व विचारक्षमतेचा विकास व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.
वाचन पंधरवड्याच्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन, तांत्रिक व अवतांत्रिक पुस्तकांचे वाचन, पुस्तक परीक्षण तसेच थोर शास्त्रज्ञ व साहित्यिकांच्या ग्रंथांचे व पुस्तकांचे प्रदर्शन यावेळी आयोजित करण्यात आले होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. पी. पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.एक चांगला अभियंता होण्यासाठी केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नसून वाचनातून येणारी व्यापक दृष्टी, मूल्यनिष्ठा व नैतिकता तितकीच महत्त्वाची आहे.विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी विषयांबरोबरच आत्मविकास, व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक जाणीव वाढवणाऱ्या पुस्तकांचे वाचन करून परिपूर्ण व्यक्तिमत्व घडविले पाहिजे. तसेच लुप्त होत असलेली वाचन कला सर्वांनी वृद्धिंगत करावी हाच या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये ग्रंथालयाचा वापर वाढला असून वाचनसंस्कृतीला चालना मिळाल्याचे चित्र दिसून आले. वाचन पंधरवडा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन रोहन परिचारक यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. कणसे, रजिस्ट्रार गणेश वाळके, उपप्राचार्य प्रा.जगदीश मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात शैक्षणिक अधिष्ठाता प्रा.राहुल पांचाळ, विभाग प्रमुख डॉ. एस. एम. लंबे, डॉ.एस. व्ही. एकलारकर, डॉ.अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल सहाय्यक गणेश येडगे व चंद्रकांत घाडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
























