तभा फ्लॅश न्यूज/नायगांव : “जिच्या आयुष्यात एक नवीन जीव येण्याची उमेद होती,तिथेच तिचाच श्वास अचानक थांबला!” वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी एका तरुण विवाहितेचा गरोदर असतानाच मृत्यू झाला आणि तिच्या कुंटुंबावर आभाळ कोसळले. हे दुर्दैव घडले नायगांवमधील वडजे प्रसूती रुग्णालयात, जिथे तिच्यावर झालेल्या चुकीच्या उपचारांमुळे तिचा जीव गेला, असा गंभीर आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या विवाहितेची प्रकृती अचानक खालावली आणि वडजे डॉक्टरांनी तिला नांदेडला हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, वेळ निघून गेलेली होती. नांदेडला नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. नांदेडमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी वडजे रुग्णालयातील उपचार पद्धतीवर आक्षेप घेत “प्राथमिक उपचार चुकीचे होते” असा निष्कर्ष दिला, असे तिच्या कुंटुंबियांनी सांगितले.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेकडो नातेवाईकांनी सोमवारी दुपारी नायगांव येथील डॉ.वडजे रुग्णालयासमोर मोठा जमाव केला. राग अनावर झाल्याने काही जण रुग्णालयात घुसले. वेळेवर पोलिस आणि गावातील सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, डॉ. वडजे आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गेट बंद करून स्वतःला लपवले होते.
या रुग्णालयाविरोधात यापूर्वीही अशा घटनांची कुजबूज होती. स्थानिक नागरिकांच्या मते, याच रुग्णालयात मागील काही महिन्यांत सात ते आठ महिलांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मृत्यू झाले ल्यांमध्ये देगांव येथील तीन महिला असल्याची माहिती समोर येत आहे. आरोप आहे की, प्रत्येक वेळी प्रकरण आर्थिक व्यवहार करून मिटवले जाते आणि त्यामुळेच येथील वडजे रुग्णालय व प्रशासना ची सातत्याने बेपर्वाई वाढतच चालली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी,आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी संतप्त मागणी यावेळी नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे. “महिलांच्याजीवाशी खेळणाऱ्या वडजे रुग्णालयाची सखोल चौकशी झाली पाहिजे,” अशी ठाम भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. डाॅ.वडजे यांच्या चुकीच्या उपचाराने तालुक्यातील एका निष्पाप मातेचे प्राण गेले, याला जबाबदार कोण?